१०. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : खगोलशास्त्र

पण प्राचीन ग्रीक लोकांना हे सारे का जाणून घ्यावेसे वाटले असेल!? आणि ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या जडणघडणीमागे कोणाचा हात असावा? प्राचीन काळातील जीवन हे अत्यंत अस्थिर होते. अनियंत्रित निसर्ग, रोगरोई, आपापसांतील लढाया, अशा कारणांमुळे त्याकाळी मानवी जीवनास शाश्वती नव्हती. आयुष्याची खात्री नसेल, तर भयभित मन कशाचा तरी आधार शोधू लागते. हा आधार शोधणारी आगतिकता माणसास अंधश्रद्धेच्या उंबरठ्यावर घेऊन जाते. प्राचीन लोक जसे श्रद्धाळू होते, तसेच ते अंधश्रद्धाळू देखील होते. चंद्राला लागलेल्या लाल ग्रहणास ते अशुभ मानत असत. त्यामुळे लाल चंद्र नेमका कधी दिसेल? हे जाणने त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे असायचे. याशिवाय निरनिराळ्या रुढी, परंपरा, उत्सव हे वेळेनुसार साजरे करायचे झाल्यास कालगणना आवश्यक होती. सोबतच पिक-पाणी, व्यापार-उदिम यादृष्टीनेही वेळेचे नियोजन महत्त्वाचे होते. मानवी पूर्वजांनी आपले आयुष्यच जणू अवकाशातील ग्रहगोलांमध्ये गुंफले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण दैनंदिन जीवनाची ग्रहगोलांशी सांगड घालणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी गणित व खगोलशास्त्राचा सखोल आभ्यास गरजेचा होता.

प्राचीन ग्रीक गणित

प्राचीन ग्रीक गणित

व्यवहार हा मानवी सहजीवनाचा अपरिहार्य भाग असल्याने अगदी पुरातन काळापासून निरनिराळ्या संस्कृतींचा आपापसांत व्यापार चालत असे. त्यायोगे ऐकमेकांसोबत ज्ञानाचीही देवाणघेवाण होऊ लागली. भूमध्य समुद्राभोवती विकासित झालेल्या मानवी संस्कृतींचा अशाप्रकारे उत्कर्ष होत गेला. परंतु गणिताशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होत नाही. वस्तूंची देवाणघेवाण करण्यापासून ते एखादी भव्य वास्तू उभारेपर्यंत सर्वत्र गणिताचा वापर केला जातो. पुरातन ग्रीक संस्कृतीतही याकरणाने भूमितीचा सखोल आभ्यास करण्यात आलेला दिसून येतो. त्यांच्या कल्पक, विस्मयकारक व नितांत सुंदर अशा स्थापत्यकलेचा भूमिती हा जणू पायाच होता! याशिवाय खगोलशास्त्राच्या अनुषंगानेही प्राचीन लोकांच्या जीवनात गणिताचा प्रवेश झाला. अवकाशातील ग्रह-तारे हे त्यांच्या देवदेवतांचे प्रतिनिधित्व करत असत!

चंद्रकला

चंद्रकला

पोर्णिमा ते अमावस्या यादरम्यान चंद्रकला टप्याटप्याने बदलत जातात. अशाने चंद्राकडे पाहून महिन्यातील दिवसांची नोंद ठेवणे सोपे जाते. म्हणूनच जुन्या काळी कालगणना ही चंद्राच्या अनुषंगाने होत असल्याचे दिसून येते. परंतु वर्षातील ऋतू हे सूर्यानुसार बदलत जातात. त्यामुळे वर्षाकाठी कुठेतरी चंद्राची व सूर्याची सांगड घालणे आगत्याचे ठरते. प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या व सूर्याच्या वर्षभरातील वाटचालीचे सूक्ष्म निरिक्षण नोंदवले होते. यातूनच त्यांना या ग्रहगोलांच्या हालचालींची गणितीय मांडणी करणे शक्य झाले. परंतु ग्रहगोलांची हालचाल गिअरच्या सहाय्याने एका छोट्याशा यंत्रात प्रतिबिंबित करणे, हे एक वेगळेच आव्हान होते! त्याकरिता खूप मोठ्या कल्पनाशक्तिची गरज होती.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!