९. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : लिखित मजकूर

परंतु या यंत्राभोवतालचे रहस्य अजूनही पुरते उलगडले नव्हते. या यंत्रात असे अनेक गिअर होते, ज्यांचे प्रयोजन समजणे बाकी होते. द्विआयामी एक्स-रे छबीमधून तज्ञांना या यंत्राबाबत अंशतः माहिती मिळाली खरी! परंतु अधिक माहिती मिळविण्याकरिता आणखी प्रगत अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्याचवेळी एखाद्या वस्तूची त्रिमितीय एक्स-रे छबी तयार करु शकेल, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान इंग्लंडमध्ये विकसित करण्यात आल्याचे तज्ञांना समजले. परंतु हे तंत्रज्ञान जीर्ण अशा ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’पर्यंत पोहचवणे हे एक आव्हान होते. तज्ञांनी व तंत्रज्ञांनी त्यासाठी मोठा खटाटोप केला. अखेर ते खास त्रिमितीय एक्स-रे यंत्र ग्रीसमधील संग्रहालयापर्यंत प्रयत्नांती आणण्यात आले. तिथे ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’ची त्रिमितीय छबी काढण्यात आली. त्यामुळे त्या प्राचीन यंत्राचे आणखी काही अज्ञात पैलू समोर आले.

अँटिकिथरो मेकॅनिझमचा त्रिमितीय एक्स-रे

अँटिकिथरो मेकॅनिझम – त्रिमितीय एक्स-रे छबी

‘अँटिकिथरो मेकॅनिझम’चा जवळपास अर्धा भागच त्यामितीस शिल्लक उरला होता. तरी त्यात एकून २७ गिअर असल्याचे त्रिमितीय छबीमध्ये दिसत होते. पूर्णस्वरुप यंत्रात कदाचित याहून अधिक गिअर असले असते. या छबीमुळे प्रत्येक गिअरची स्थाननिश्चिती करण्यास देखील मदत झाली. परंतु ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’बाबत अजूनही बर्‍याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या होत्या. त्याकरिता त्यावरील अस्पष्टासा लिखित मजकूर उद्धृत करणे गरजेचे होते. त्यासाठी पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.

अँटिकिथरो मेकॅनिझमवरील लिखित मजकूर

अँटिकिथरो मेकॅनिझम – लिखित मजकूर

‘अँटिकिथरो मेकॅनिझम’वरील अस्पष्ट मजकूर उधृत केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. याकामी प्राचीन ग्रीक भाषा तज्ञांची मदत घेण्यात आली. उपलब्ध मजकूराचा आभ्यास केला असता तज्ञांना जे आढळले, ते अगदी थक्क करणारे होते! भविष्यात ‘चंद्रग्रहण’ व ‘सूर्यग्रहण’ कधी होईल? याचा अचूक कयास ‘अँटिकिथरो मेकॅनिझम’च्या सहाय्याने त्याकाळी बांधता यायचा. एव्हढेच नव्हे! तर ग्रहण किती वाजता होईल? ग्रहणाच्या सावलीची दिशा कोणती असेल? चंद्रग्रहणाचा रंग कोणता असेल? ही सारी विस्तृत माहिती त्या यंत्राच्या सहाय्याने मिळू शकत असे.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!