६३. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : प्रकल्पास मंजुरी

दुसर्‍या महायुद्धादरम्यान अमेरिकेमार्फत युरोप व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री पाठवली जात होती. हल्याचे निर्धारित लक्ष बहुतांशवेळा तोफांपासून दूर असे. लक्ष्याचा अचूक वेध घेण्याकरिता प्रथम लक्ष निर्धारित करणे गरजेचे होते. त्यासाठी ‘फायरिंग टेबल’चा वापर केला जात असे. फायरिंग टेबल तयार करत असताना वार्‍याची गती, वार्‍याची दिशा, आद्रता, हवेचे तापमान, समुद्रसपाटीपासूनची उंची, जमिनीची सपाटी, इत्यादी अनेकानेक घटक विचारात घेतले जात. शिवाय प्रत्येक प्रकारच्या तोफेकरिता आणि दारुगोळ्याकरिता निरनिराळ्या प्रकारचे फायरिंग टेबल गरजेचे ठरत. म्हणूनच फायरिंग टेबल तयार करण्यासाठी अमेरिकी सेन्यामार्फत स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला होता. तिथे काम करणार्‍या मानवी संगणकांच्या दिमतीला विविध प्रकारची मेकॅनिकल यंत्रे देण्यात आली होती. परंतु इतके सारे करुनही फायरिंग टेबल तयार करण्याचे काम हाताबाहेर जाऊ लागले. कारण त्यासाठी अतिशय प्रचंड आकडेमोड करावी लागत असे.

हर्मन गोल्डस्टाईन

हर्मन गोल्डस्टाईन

फायरिंग टेबल संबंधित कामाची जबाबदारी ही हर्मन गोल्डस्टाईन यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी ते केवळ २९ वर्षांचे होते. ते स्वतः एक गणिततज्ञ होते. या कामाची गती वाढवण्यात यावी असा त्यांच्यावर वरिष्ठांकडून दबाव होता. जॉन मॉकली यांच्या इलेक्ट्रॉनिक संगणकाची कल्पना एकदा गोल्डस्टाईन यांच्या कानावर पडली. गोल्डस्टाईन यांनी तत्काळ मॉकली यांची भेट घेतली. कामाची गती जर वाढवायची असेल, तर इलेक्ट्रॉनिक संगणकाशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले. मॉकली यांचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आपण आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करु, असे गोल्डस्टाईन यांनी त्यांस आश्वासन दिले. दरम्यान मॉकली यांच्या प्रस्तावाची प्रत गाहाळ झाली. त्यामुळे त्यांना नव्याने तो प्रस्ताव तयार करावा लागला.

मागील भाग| पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!