६४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : प्रकल्पास सुरुवात

९ मे १९४३ रोजी जे. प्रेसपर एकर्ट यांचा २४ वा वाढदिवस होता. त्याचदिवशी संरक्षण विभागाकडून मॉकली व एकर्ट यांच्या प्रकल्पास अधिकृत मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे त्यांना सरकारकडून आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळाले. त्यांनी लगेचच आपल्या कामास सुरुवात केली. एकर्ट यांनी मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी संभाळली, तर मॉकली हे सल्लागारपदी विराजमान झाले. त्यांनी आपल्या प्रकल्पास ‘इलेक्ट्रॉनिक न्युमेरिकल इंटिग्रेटर’ असे नाव दिले. बॅलेस्टिक मिसाईलच्या ट्रेजेक्टरीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प प्रामुख्याने हाती घेण्यात आला होता. तरी पुढे या प्रकल्पास जोड देऊन इतरही अनेक समस्या सोडवता आल्या असत्या. तेंव्हा भविष्यात या प्रकल्पास जोड देते वेळी सरकारकडून काही हरकत घेतली जाऊ नये, म्हणून या प्रकल्पाचे नाव बदलून ‘इलेक्ट्रॉनिक न्युमेरिकल इंटिग्रेटर अँड कंम्प्युटर’ म्हणजेच ‘इनिॲक’ असे करण्यात आले.

इनिअॅक काऊंटर

‘इनिॲक’ हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी खूप सार्‍या माणसांची गरज होती. मॉकली व एकर्ट यांनी इलेक्ट्रॉनिक काऊंटर तयार करण्यापासून या कामाची सुरुवात केली. प्रकल्पाची एकंदरीत बैठक बसेपर्यंत मॉकली यांनी त्यात विशेष भूमिका बजावली. यादरम्यान ते अधुनमधून ॲटॅनॅसऑफ यांना भेटायला जात असत. अखेरच्या भेटीत मॉकली यांनी ॲटॅनॅसऑफ यांना आपण सैन्यासाठी संगणक तयार करत असल्याचे सांगितले. त्यांनी संगणक तयार करण्याचा एक नवा मार्ग शोधला असल्याचे ॲटॅनॅसऑफ यांच्या कानावर घातले. ॲटॅनॅसऑफ यांनी कुतूहलापोटी त्याबाबत विचारले. तेंव्हा तो प्रकल्प गुप्त असून त्याबाबत अधिक काही सांगणे शक्य नसल्याचे मॉकली यांनी नमूद केले. त्याकाळी सैन्याचे अनेक प्रकल्प गुप्तपणे सुरु होते. त्यामुळे ॲटॅनॅसऑफ यांना मॉकली यांचे कारण पटले.

जॉन मॉकली यांनी प्रकल्पाची बैठक घालून दिली. त्यानंतर एकर्ट यांनी या प्रकल्पाची सुत्रे प्रामुख्याने हाताळली. गोल्डस्टाईन यांनी देखील त्यात आपला सहभाग नोंदवला. एकर्ट यांनी मूरे स्कूलमधील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी नियुक्त केले. १९४३ सालच्या उत्तरार्धात त्यांनी तरुण इंजिनिअर्सचा एक गट तयार केला आणि त्यापैकी प्रत्येकास आपापली कामे वाटून दिली.

आयबीएमचा ‘हार्वर्ड मार्क १’ हा त्याकाळातील एक अत्याधुनिक इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणक होता. तरी त्यास ज्या वेगात अज्ञावली पुरवली जात असे, साधारण त्याच वेगात तो काम करत असे. या संगणकास अज्ञावली पुरवण्याकरिता ‘पंचकार्ड’चा वापर होत होता. परंतु ‘इनिॲक’ हा एक अत्यंत वेगवान असा इलेक्ट्रॉनिक संगणक असल्याने ‘पंचकार्ड’ वा ‘पेपर टेप’चा वापर करणे या संगणकाच्या दृष्टीने तितकेसे व्यवहारी नव्हते. त्यामुळे इनिॲकची रचना करत असताना त्यात या गोष्टीचा विचार करण्यात आला होता.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!