७०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : इलेक्ट्रॉनिक ब्रेन

एव्हाना इनिॲकचा विविध प्रसिद्धी माध्यमांमधून गाजावाजा झाला होता. प्रसिद्धी माध्यमांनी त्यास ‘इलेक्ट्रॉनिक ब्रेन’ अशी संज्ञा दिली. त्यामुळे जगभर या यंत्राबाबत उत्सुकता निर्माण झाली. दुसरे महायुद्ध संपून आता वर्ष होत आले होते. त्यामुळे महायुद्धात प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानामध्ये सर्वांनाच स्वारस्य होते. विविध सरकारी, खाजगी, तसेच उद्योगिक अशा संस्थांनी मूरे स्कूलला तंत्रज्ञानाबाबत विनंती केली. इकडे मूरे स्कूलमधील तंत्रज्ञ एकतर वॉन नॉयमन यांच्या संगणक प्रकल्पात किंवा एकर्ट व मॉकली यांच्या नव्या कंपनीत सामिल होत होते. त्यामुळे मूरे स्कूलवर त्यावेळी कामाचा पुष्कळ ताण होता.

१२ डिसेंबर १९४७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आलेली संगणक विषयक बातमी

१२ डिसेंबर १९४७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आलेली बातमी

या सर्व परिस्थित मूरे स्कूलने अखेर एक कोर्स आयोजित केला. १९४६ सालच्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत हा कोर्स पार पडला. त्यात विविध संस्थांच्या केवळ ३० ते ४० प्रतिनिधींना निमंत्रणावरुन सहभागी करुन घेण्यात आले होते. कोर्सचे वेळापत्रक अगदी भरगच्च होते. तेथील विद्यार्थ्यांत होतकरु शास्त्रज्ञ, गणितज्ञ, तसेच अभियंते यांचा समावेश होता. एकर्ट, मॉकली, गोल्डस्टाईन, इत्यादी लोकांनी त्यांस शिकवण्याचे काम केले. याशिवाय वॉन नॉयमन यांनी देखील काही तास घेतले. कोर्सदरम्यान इनिॲक विषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली. मात्र एडवॅक संदर्भात अगदी मर्यादित माहिती दिली गेली. कारण तोपर्यंत तो एक गुप्त प्रकल्प होता व त्यांस त्याबाबत गुप्तता बाळगायची होती. तरी कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना एडवॅकची ठोकळाकृती दाखवण्यात आली. मूरे स्कूल येथील कोर्स पूर्ण झाल्यानंतर संगणक निर्मितीच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या.

इकडे एडवॅकच्या निर्मितीचे काम अजूनही सुरुच होते. एकर्ट व मॉकली आणि पेन्सलवेनिया विद्यापीठ यांच्यादरम्यान पेटंटचा वाद रंगल्याने खरं तर एडवॅकच्या निर्मितीस विलंब होत होता. एकर्ट व मॉकली यांनी पेटंटच्या कारणास्तव राजिनामा देऊन जेंव्हा स्वतःची कंपनी स्थापन केली, तेंव्हा एडवॅक प्रकल्पावर काम करणारे अनेक तज्ञ त्यांच्या नव्या कंपनीत रुजू झाले. अशाने एडवॅकच्या निर्मितीची गती मंदावली. अखेर १९४९ सालच्या ऑगस्ट महिन्यांत एडवॅक संगणक अमेरिकी सेनेला हस्तांतरित करण्यात आला. तरी त्यातील उरल्यासुरल्या समस्या सोडवण्याचे काम १९५१ सालापर्यंत सुरुच होते. या संगणकाच्या निर्मितीसही साधरण इनिॲक एव्हढाच खर्च आला. पुढील दशकभर या संगणकाने आपली कामगिरी केली. त्यादरम्यान त्यात अधुनमधून सुधारणा करण्यात येत होत्या. सरतेशेवटी या संगणकास १९६१ साली निवृत्ती देण्यात आली. त्यानंतर त्याची जागा दुसर्‍या संगणकाने घेतली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!