४८. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : इलेक्ट्रॉनिक संगणकाची चाचणी

१९४१ सालच्या अखेरीस ‘ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर’ (एबीसी) चाचणीसाठी सज्ज झाला. क्लिफोर्ड बेरी यांनी ‘तो संगणक कसा वापरावा?’ हे विषद करणारी कार्यपुस्तिका लिहून तयार ठेवली होती. एबीसी संगणकाची यशस्विता तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली, तेंव्हा जवळपास सारे घटक अगदी व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले. तरी त्यावर आणखी थोडे काम करणे गरजेचे होते.

ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर

ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर

इकडे ॲटॅनॅसऑफ यांचा संगणक पाहून जॉन मॉकली अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांनी लागलीच इलेक्ट्रॉनिक्सचा एक कोर्स पूर्ण केला. तिथेच त्यांची प्रेसपर एकर्ट यांच्याशी ओळख झाली. त्या दोघांनी मिळून त्यांचा स्वतःचा संगणक तयार करण्याचे ठरवले. १९४१ सालच्या सप्टेंबर महिन्यात मॉकली यांनी ॲटॅनॅसऑफ यांना एक पत्र पाठवले. ‘आपल्या एबीसी संगणकातील काही संकल्पना जर माझ्या संगणकात वापरल्या तर चालेल का?’ असा त्या पत्राचा एकंदरीत सूर होता. परंतु एबीसी संगणकाच्या पेटंटचे काम अजून पूर्ण व्हायचे होते. त्यामुळे ॲटॅनॅसऑफ यांनी त्यांना काही काळ थांबण्यास सांगितले.

दरम्यान १९३९ साली सुरु झालेल्या दुसर्‍या महायुद्धाने चांगलीच पकड घेतली होती. हिटलरच्या नेतृत्त्वाखाली जर्मन सेना युरोपमधील देश पादाक्रांत करत होत्या. पुढे डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या नाविक तळावर हल्ला चढवला. परिणामी अमेरिकेनेही या युद्धात प्रत्यक्षपणे उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही महिन्यांतच ॲटॅनॅसऑफ यांना नौदलाकडून एका गुप्त प्रकल्पावर काम करण्याकरिता पाचारण करण्यात आले. परंतु एबीसी संगणकाच्या पेटंटचे काम अजूनही पूर्ण व्हायचे होते. विद्यापिठाने ॲटॅनॅसऑफ यांना संगणक बांधणीकरिता अर्थसहाय्य केले असल्याने त्या संगणकाचे पेटंट विद्यापिठाच्या नावे करण्याचे ठरले होते. ॲटॅनॅसऑफ यांनी पेंटंट मिळवण्याबाबत विद्यापिठातील अधिकार्‍यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यानंतर नौदलाच्या प्रकल्पावर काम करण्याकरिता त्यांनी वॉशिंग्टनकडे प्रयान केले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!