आज ‘समकालीन’मध्ये गतिमान इंटरनेट, ५जी सेवा, स्वयंचलित कार, रोबोटीक शस्त्रक्रिया, समुद्रतळाशी उत्खनन, व्हॉट्अॅप डार्क मोड आणि खूप काही!

ब्रॉडबँड इंटरनेटची गती वाढणार

जीसॅट ११ उपग्रह

भारताचा आजवरचा सर्वांत शक्तिशाली उपग्रह ‘जीसॅट-११’ काल फ्रेंच गयाना येथून अंतराळात सोडण्यात आला. या उपग्रहामुळे भारतातील ब्रॉडबँड इंटरनेट सेवेची गती वाढण्यास मदत मिळणार असून ग्रामीण भागाला याचा विशेष फायदा होईल. जीसॅट-११ हा उपग्रह ५८५४ किलोंचा असून याचा कार्यकाळ १५ वर्षांचा असेल.

नासाचे यान बेन्यूवर पोहचले

बेन्यू

भविष्यात पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असणाऱ्या ‘बेन्यू’ या खगोलीय पिंडाच्या दिशेने नासाने २०१६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात एक यान सोडले होते. हे यान आता या पिंडाजवळ पोहोचले असून या पिंडाच्या अभ्यासासाठी त्याच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परीक्षणासाठी आणले जाणार आहेत.

पुढील वर्षी ५जी सेवा सुरू होणार

५जी इंटरनेट

दक्षिण कोरियात लवकरच ५जी सेवा सुरू होत असली, तरी भारतात मात्र पुढील वर्षाच्या उत्तरार्धात ५जी सेवेचे आगमन होण्याची शक्यता आहे. ५जी सेवा आल्याने ४जी सेवा बंद होणार नसून हे दोन्ही तंत्रज्ञान एकमेकांना पूरक असे काम करतील.

उबर पुन्हा स्वयंचलित कारची चाचणी सुरू करणार

उबर स्वयंचलित कार

उबरच्या स्वयंचलित कारमुळे नऊ महिन्यांपूर्वी एका पादचाऱ्याचे निधन झाले होते. तेंव्हापासून उबरने आपल्या स्वयंचलित कारची चाचणी बंद केली होती. पण आता ही चाचणी पुन्हा सुरू होणार असल्याचे समजते. स्वयंचलित कारसाठी उबरने वोल्वो आणि टोयोटा सोबत करार केलेला आहे, शिवाय स्वयंचलित कार हेच वाहतुकीचे भविष्य असल्याने अशाप्रकारच्या चाचण्या घेणे कंपनीसाठी क्रमप्राप्त होते.

हायब्रिड ऊर्जा प्रकल्पाचा लिलाव यशस्वी

हायब्रिड ऊर्जा

सौरऊर्जा आणि पवनऊर्जा यांच्या एकत्रीकरणातून ऊर्जा निर्मिती करू शकेल अशा हायब्रीड ऊर्जा प्रकल्पासाठी भारतामध्ये लिलाव घेण्यात आला होता. त्यामध्ये २.६७ रुपये प्रति युनिट या दराने विजयी बोली लावण्यात आली. २०३० सालापर्यंत भारतातील ४०% विद्युतऊर्जा अपारंपारिक ऊर्जा साधनांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हृदयावरील पहिली रोबोटीक शस्त्रक्रिया

रोबोटीक शत्रक्रिया

काल अहमदाबाद येथील एका रुग्णालयात एका हृदयरुग्णावर भारतातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समजते. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी ३२ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर येथून केली. यासाठी जे यंत्र वापरण्यात आले त्याची किंमत सुमारे १ अब्ज रुपये असून त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला आहे.

ड्रोनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पोहोचवण्याची योजना

ड्रोन

भविष्यात ड्रोनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पोहोचवता यावेत यासाठी ‘झोमॅटो’ने लखनऊ येथील ‘टेकईगल’ नावाची कंपनी विकत घेतली आहे. तेंव्हा लवकरच आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ एखादे ड्रोन आपल्या गॅलरीमध्ये घेऊन आल्यास आश्चर्य वाटायला नको!

अमेझॉन भारतातील गुंतवणूक वाढवणार

अमेझॉन

‘वॉलमार्ट’ने ताबा घेतल्यानंतर ‘फ्लिपकार्ट’मुळे भारतात नव्याने उभे ठाकलेले आव्हान पाहता ॲमेझॉनने आता येथील बाजारात २२ अब्ज रुपयांची नवी गुंतवणूक करण्याचे मनावर घेतले आहे. ऑनलाईन खरेदीचे वरचेवर वाढत असलेले प्रमाण पाहता येत्या काळात ही स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

‘जिओ म्युझिक’ आता ‘जिओसावन’ होणार

जिओसावन

भारतातील संगीत बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी ‘जिओ’ने आता ‘सावन’ सोबत करार केला असून जिओचे म्युझिक ॲप आता ‘जिओसावन’ नावाने ओळखले जाणार आहे. अशाने ‘गाना’ या लोकप्रिय अॅपला ते आव्हान देऊ शकतील. ‘गाना’ मधील गाण्यांची संख्या मर्यादित असल्याने त्यांना जिओच्या नव्या आव्हानासमोर कितपत तग धरून राहता येईल याबाबत शंका आहे! सध्या ‘ॲमेझॉन म्युझिक’, ‘विंक’ अशा इतर काही मोठ्या कंपन्या संगीत क्षेत्रात कार्यरत असताना येत्या काही महिन्यात ‘स्पॉटीफाय’ देखील या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे.

इंटरनेटवरील बंदी ही व्यक्तिस्वातंत्र्यावरील गदा

इंटरनेटवरील बंदी

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन भारतात इंटरनेट सेवा बंद करण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. शशी थरुर यांच्या मते ही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर येत असलेली गदा असून अशाने सरकारला नागरिकांवर अधिराज्य गाजवणे सोपे जाते. आपल्या इथे पेपर फुटी सारख्या कारणांसाठी देखील इंटरनेट सुविधा बंद करण्यात येते. हे योग्य नसून अशाने नागरिकांच्या व्यवहारांवर व व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा येते असे त्यांचे मत आहे.

व्हॉट्सअॅपवर ‘डार्क मोड’ची सुविधा येणार

व्हॉट्सअॅप डार्क मोड

भारतात अत्यंत लोकप्रिय असणारे व्हाट्सॲप लवकरच डार्क मोड मध्ये उपलब्ध होणार असल्याचे समजते. डार्क मोडमुळे एकतर आपल्या स्मार्टफोनची बॅटरी वाचेल आणि दुसरे म्हणजे विशेषतः अंधारात आपल्या डोळ्यांवर फारसा ताण येणार नाही. स्मार्टफोन आणि शरीरच्या आरोग्याच्या दृष्टीने हा बदल स्वागतार्ह आहे!

नोकियाचा ८.१ अँड्रॉइड फोन लॉन्च

नोकिया ८.१

अँड्रॉइड कार्यप्रणाली स्वीकारल्यापासून ‘नोकिया’ आता पुनरुज्जीवित होण्याच्या मार्गावर आहे. नोकिया ८.१ हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च झाला असून यात ६.१८ इंच आकाराची स्क्रीन आहे. २.२ GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटर्नल मेमरी, २० मेगा पिक्सेल फ्रंट आणि १३ मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा, ४०० जीबीपर्यंतचे मेमरी कार्ड वापरण्याची क्षमता, ३५०० mAh काढता येण्याजोगी बॅटरी अशी या फोनची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या फोनची किंमत ३२ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सायबर हल्ले दाहशतवादाहून धोकादायक

सायबर हल्ला

सायबर हल्ले हे दहशतवादाहून अधिक धोकादायक असल्याचे मत कॅनडाच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे. यातून लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असे ते सांगतात. एकंदरीत पाहता भविष्यातील लढाया या सीमेवर नव्हे, तर आभासी वास्तवात लढल्या जातील असे चित्र आहे.

ऑस्ट्रेलियात व्हॉट्सअॅपवर सरकारची नजर

व्हॉट्सअॅप

संदेश सेवांचा होणारा गैरवापर पाहता ऑस्ट्रेलियामध्ये असा कायदा संमत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सरकारला नागरिकांच्या व्हाट्सऍप आणि टेलिग्राम संदेशांवर नजर ठेवता येईल. गोपनीयतेच्या दृष्टीने या कायद्यावर टीका होत असली, तरी सरकारच्या दृष्टीने मात्र देशाच्या सुरक्षेसाठी असे करणे गरजेचे आहे.

भारत समुद्रतळाशी खनिजसंपत्तीचा शोध घेणार

समुद्रतळाशी खनिज उत्खनन

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारतर्फे समुद्रतळाशी असलेल्या खनिज घटकांचा शोध घेतला जाणार आहे. विद्युत उपकरणांमध्ये निरनिराळ्या खनिज घटकांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात खनिज घटकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून समुद्रतळाशी खनिज संपत्तीचे उत्खनन सुरू होणे अपेक्षित आहे.

पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!