६६. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : मतभेद

१९४४ सालच्या ऑगस्ट महिन्यात वॉन नॉयमन इनिॲक प्रकल्प पाहण्याकरिता आले. तेंव्हा इनिॲकच्या निर्मितीचे काम अगदी जोरात सुरु होते. तिथे काम करणार्‍या सर्वांनाच या भेटीबाबत उत्सुकता होती. वॉन नॉयमन यांनी त्या यंत्राच्या लॉजिकल स्ट्रक्चरबाबत पहिला प्रश्न विचारला. तेंव्हा ते प्रतिभावंत असल्याची एकर्ट यांना खात्री पटली. वॉन नॉयमन यांनी इनिॲकची व्यवस्थित पाहणी केली. त्यावेळी त्यांना त्यात फार कमी स्टोरेज असल्याचे दिसून आले. शिवाय त्यात खूप सार्‍या व्हॅक्युम ट्युब्जचा वापर करण्यात आला होता आणि त्याचे रिप्रोग्रॅमिंग करणे देखील अवघड होते.

जॉन वॉन नॉयमन हे एक गणितज्ञ होते. त्यामुळे त्यांना ॲलन ट्युरिंग यांच्या कामाविषयी माहिती होती. ट्युरिंग मशिनमध्ये तर्कशास्त्राच्या आधारे प्रोग्रॅमेबल संगणकाचा विचार मांडण्यात आला होता. १९३७ साली ॲलन ट्युरिंग शिक्षणाकरिता अमेरिकेत आले असता वॉन नॉयमन यांनी त्यांना तिथेच थांबण्याबाबत सुचवले होते. परंतु १९३८ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले, तसे ॲलन ट्युरिंग यांना इंग्लंडमध्ये बोलवण्यात आले. इनिग्मा मशिनशी संबंधित ‘बेचली पार्क’ येथील गुप्त प्रकल्पात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

इनिॲकचा प्रकल्प अजूनही सुरुच होता. परंतु एकर्ट व मॉकली यांनी एव्हाना पुढील प्रकल्पावर विचार करण्यास सुरुवात केली होती. इनिॲकमध्ये स्टोरेज कमी असल्याने अज्ञावलीकरिता बाह्य जोडणीवर विसंबून रहावे लागत असे. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या समस्या सोडवण्यासच त्या यंत्राचा उपयोग होत होता. उर्वरीत सर्व प्रकारच्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्यासाठी इनिॲकच्या अंतर्गत स्टोरेजमध्ये वाढ करणे गरजेचे होते. तेंव्हा एकर्ट व मॉकली यांनी त्यादिशेने प्रयत्न सुरु केले.

इकडे जॉन वॉन नॉयमन इनिॲक प्रकल्पाचे सल्लागार बनले होते. त्यांनी त्या प्रकल्पातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच गणितीय व तार्किक दृष्टिकोनातून त्यांनी पुढील प्रकल्पाचा विचार करण्यास सुरुवात केली. वॉन नॉयमन यांचे इनिॲक प्रकल्पात आगमन झाले त्याच्या आसपासच संगणकाच्या आत अज्ञावली (Program) साठवण्याची संकल्पना पुढे आली. ती एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना होती. यामुळे एका बाजूला संगणकाची गती वाढीस लागली, तर दुसर्‍या बाजूला इलेक्ट्रॉनिक भागांची आवश्यकता कमी झाली.

जॉन वॉन नॉयमन आणि हर्मन गोल्डस्टाईन

जॉन वॉन नॉयमन आणि हर्मन गोल्डस्टाईन

भविष्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पाचे नाव ‘इलेक्ट्रॉनिक डिस्क्रिट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कंम्प्युटर’ म्हणजेच ‘एडवॅक’ असे निश्चित करण्यात आले. एकर्ट व मॉकली हे पुढील प्रकल्पाकडे ज्या दृष्टीकोनातून पहात होते, त्याहून वॉन नॉयमन व गोल्डस्टाईन यांचा दृष्टीकोन काहीसा निराळा होता. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!