७२. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग १

दुसरे महायुद्ध सुरु असताना सांकेतिक संदेश भेदणे निकडीचे होते. त्यावेळी त्यात ब्रिटनने अगदी भरिव कामगिरी केली. सांकेतिक संदेश भेदण्याकरिता त्यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रही विकसित केले होते. याशिवाय ‘युनिव्हर्सल मशीन’ची संकल्पना मांडनारे ॲलन ट्युरिंग हे देखील ब्रिटिश होते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक संगणक तयार करण्याच्या दृष्टीने त्या देशात बर्‍यापैकी पोषक वातावरण होते असे म्हणता येईल.

महायुद्ध संपल्यानंतर ॲलन ट्युरिंग यांनी ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी’ येथे स्वतःचा इलेक्ट्रॉनिक संगणक प्रकल्प सुरु केला. त्यादृष्टीने त्यांनी एक संगणकीय रचना तयार केली. त्यांच्या सहकार्‍यांना मात्र ती रचना प्रत्यक्षात उतरवणे आव्हानात्मक वाटले. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. दरम्यान मॅन्चेस्टर विद्यापिठात एक संगणक प्रकल्प सुरु करण्यात आला होता. कोलॉसिसच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मॅक्स न्यूमन हे त्या प्रकल्पाचे प्रमुख होते. ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’मधील संकल्पनांचा यात विचार करण्यात आला होता.

मॅक्स न्यूमन

मॅक्स न्यूमन

महायुद्धानंतर मॅक्स न्यूमन मॅन्चेस्टर विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक बनले, तेंव्हा एडवॅक सारखा संगणक तयार कराण्याहेतूने त्यांनी विद्यापिठाकडून अनुदान मिळवले. त्यानंतर एफ. सी. विल्यम्स यांचा पाठपुरावा करुन त्यांनी त्यांस आपल्या प्रकल्पात सामावून घेतले. विल्यम्स कुशल रडार इंजिनिअर होते. मॅक्स न्यूमन यांनी विल्यम्स यांना ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ ही संकल्पना समजावून सांगितली. त्यानंतर विल्यम्स यांनी आपले कौशल्य वापरुन मेमरीशी निगडीत समस्या सोडवल्या. त्यामुळे संगणक निर्मितीचा मार्ग सुकर झाला. अशाप्रकारे २१ जून १९४८ रोजी मॅन्चेस्टर विद्यापिठाचा संगणक तयार झाला. हा ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ प्रकारातील पहिला संगणक होता. याचे नाव ‘स्मॉल स्केल एक्सपेरिमेंटल कंम्प्युटर’ (SSEC) असे ठेवण्यात आले. हा संगणक आकाराने लहान होता. त्यामुळे तो ‘मॅन्चेस्टर बेबी’ या टोपण नावाने देखील ओळखला जात असे. या संगणकाची कार्यक्षमता चांगली होती. त्यामुळे तो अधिक विकसित करायचे ठरवले गेले. त्यातूनच ‘मॅन्चेस्टर मार्क १’ या संगणकाची निर्मिती झाली. या संगणकातून प्रेरणा घेत पुढे याप्रकारचा व्यावसायिक संगणक तयार करण्यात आला. ‘फेरान्टी मार्क १’ हा व्यावसायिकदृष्ट्या विकण्यात आलेला पहिला ‘जनरल परपज संगणक’ होता. मॅन्चेस्टर विद्यापिठात ‘मॅन्चेस्टर मार्क १’ वर काम सुरु होते, त्यावेळी केंब्रिज विद्यापिठात देखील संगणक निर्मितीचे काम चालू होते. मॉरिस विल्क्स यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!