७३. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग २

पूर्वी सांगितल्याप्रमाणे १९३० च्या दशकात संकणकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. परंतु ही पोकळी भरुन काढण्याइतपत यांत्रिक संगणक अजून विकसित झाले नव्हते. तेंव्हा त्या अनुषंगाने स्वतंत्र व्यवसाय उदयास आले. व्यवसायिकांनी आपल्या कार्यालयात मानवी संगणक नियुक्त केले. खगोलिय आकडेमोड करणे, हवामानाचा अंदाज वर्तवणे, इत्यादी प्रकारची कामे मानवी संगणकांसमोर येऊ लागली. त्यांच्या दिमतीला कॉम्पटॉमिटर, बोरोज ॲडिंग मशिन याप्रकारची गणकयंत्रे (Calculaters) असत. लेस्ली कॉम्री हे याच क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करत. त्यांनी मानवी संगणकांच्या कामकाजाची घडी अधिक चांगल्याप्रकारे बसवली. त्यामुळे या क्षेत्राची कार्यक्षमता वाढीस लागली.

लेस्ली कॉम्री

लेस्ली कॉम्री

दुसर्‍या महायुद्धाच्या रणधुमाळीनंतर जगभरातील तणावग्रस्त वातावरण थोडेफार निवळू लागले. युद्धादरम्यान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली त्यात सर्वांनाच स्वारस्य होते. अमेरिकेतील ‘इनिॲक’ संगणक सर्वत्र चर्चेचा विषय ठरु लागल्याने त्याबाबत अधिक जाणून घेण्याकरिता त्या क्षेत्रातील तज्ञ मूरे स्कूलला भेट देऊ लागले. १९४६ सालच्या सुरुवातीला कॉम्री यांनी देखील उत्सुकतेपोटी मूरे स्कूलला भेट दिली. तिथे त्यांना नॉयमन यांनी लिहिलेली एडवॅक संगणकाची माहितीप्रत मिळाली. कॉम्री अमेरिकेहून इंग्लंडला आले, तेंव्हा त्यांनी मॉरिस विल्क्स यांची केंब्रिज विद्यापिठात भेट घेतली. विल्क्स गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यावेळी ते केवळ ३२ वर्षांचे होते. युद्धकामगिरीवरुन परतल्यानंतर त्यांना आपली गणितिय प्रयोगशाळा पुर्नस्थापित करायची होती. तेंव्हा प्रयोगशाळेतील इतर साधनांसोबत एखादा संगणकही असावा असे त्यांना वाटत होते.

कॉम्री यांनी एडवॅक संदर्भातील माहितीप्रत विल्क्स यांच्या हाती ठेवली. दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत ती माहितीप्रत परत करणे अपेक्षित होते. त्यावेळी आसपास झेरॉक्स कॉपी काढण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे ते त्यातील माहिती रात्री उशीरापर्यंत वाचत राहिले. आधुनिक डिजिटल संगणकाची पायाभरणी कशी करावी? यासंदर्भातील मुलभूत तत्त्वांचा त्यात समावेश होता. ती माहितीप्रत वाचल्यानंतर विल्क्स यांच्यासाठी संगणकाच्या विकासाची दिशा स्पष्ट झाली. त्यानंतर साधारण आठवडाभराने त्यांना मूरे स्कूलमध्ये होऊ घातलेल्या कोर्ससाठी आमंत्रण मिळाले. हा कोर्स १९४६ सालच्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत पार पडणार होता. विल्क्स यांनी अमेरिकेला जाण्याबाबत लागलीच अर्ज दाखल केला. परंतु त्यांना त्याकरिता परवानगी मिळण्यास ऑगस्ट महिना उजाडला. अखेर कोर्स संपण्यास केवळ दोन आठवडे उरले असता ते मूरे स्कूलमध्ये दाखल झाले. कोर्सच्या पूर्वाधात घेण्यात आलेल्या भागाचा विल्क्स यांना पूर्वीपासूनच अंदाज होता. शिवाय त्यांचा शिकण्याचा निर्धारही दांडगा होता. त्यामुळे कोर्सची गती पकडण्यास त्यांना वेळ लागला नाही.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!