७४. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ३

विल्क्स यांनी कोर्सदरम्यान जॉन मॉकली व जे. प्रेसपर एकर्ट यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत संगणकाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. मूरे स्कूलमधील कोर्स संपल्यानंतर विल्क्स यांना इंग्लंडला जाण्यास अजून थोडा अवकाश होता. तेंव्हा त्यांनी हार्वर्ड विद्यापिठास भेट दिली. त्यावेळी तिथे ‘हार्वर्ड मार्क २’ या संगणकाची बांधणी सुरु होती. विल्क्स यांनी ‘हार्वर्ड मार्क १’ या संगणकाची पहाणी केली. ‘हार्वर्ड मार्क १’ हा आयबीएम कंपनीने तयार केलेला इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणक होता. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तो सर्वोत्तम संगणक म्हणून ओळखला जात असे. त्याची एकंदरित कार्यप्रणाली पाहता विल्क्स फारसे प्रभावित झाले नाहीत. त्यानंतर ते ‘एमआयटी’मधील अत्याधुनिक ‘डिफरन्शिअल ॲनॅलायझर’ पहायला गेले. तेथील तंत्रज्ञानानेही त्यांस आकर्षित केले नाही. पूर्वी वापरात असलेले तंत्रज्ञान आता कालबाह्य होऊ लागले होते. तेंव्हा एकंदरित विचार करता ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ हेच संगणकविश्वाचे भवितव्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत त्यांच्या मनात तिळमात्रही शंका उरली नाही!

हार्वर्ड मार्क २

हार्वर्ड मार्क २

१९४६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मॉरिस विल्स्क अमेरिकेहून इंग्लंडला परतले. त्यावेळी ‘स्टोअर्ड प्रोग्रॅम कंम्प्युटर’ तयार करण्याचा त्यांनी मनोमन निर्धार केला होता. केंब्रिज विद्यापिठातील त्यांच्या गणितीय प्रयोगशाळेकडे काही निधी उपलब्धता होता. त्यामुळे पैशांची तजविज करण्याकरिता त्यांना इतरत्र जावे लागले नाही. संगणक निर्मितीचे काम सुरु करण्यास तेव्हढा निधी पुरेसा ठरला. पुढील तीन वर्षं विल्क्स यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह भरपूर मेहनत घेतली. याच काळात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सची प्रयोगशाळा उभी केली. संगणक क्षेत्रात संशोधन करुन तंत्रज्ञानात भर घालणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामचलाऊ संगणक तयार करणे त्यांस अभिप्रेत होते. कारण याकामी सढळहस्ते खर्च करवा इतका निधी त्यांच्याकडे नव्हता.

‘जे लायन्स अँड को.’ ही इंग्लंडमधील कंपनी त्याकाळी खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात आघाडीवर होती. या कंपनीने आपले दोन वरिष्ठ व्यवस्थापक अमेरिकेतील युद्धकालिन तंत्रज्ञानाचा आभ्यास करण्याकरिता पाठवले. तिथे त्यांची हर्मन गोल्डस्टाईन यांच्याशी भेट झाली. तेंव्हा संगणकाचे व्यवसायातील महत्त्व त्यांना चांगल्याप्रकारे लक्षात आले. मॉरिस विल्क्स हे प्रत्यक्ष इंग्लंडमध्येच अशाप्रकारचा संगणक तयार करत असल्याचे गोल्डस्टाईन यांनी त्यांना सांगितले. इंग्लंडला परतल्यानंतर या व्यवस्थापकांनी विल्क्स यांची केंब्रिज विद्यापिठात भेट घेतली. तेंव्हा विल्क्स यांनी त्यांच्यासमोर आपली अडचण मांडली. एडसॅक प्रकल्पाला जर थोडा अधिक निधी मिळाला, तर ते काम लवकर पूर्ण होऊ शकेल असे त्यांनी त्या व्यवस्थापकांस सांगितले. वरिष्ठ व्यवस्थापकांनी कंपनीतर्फे विल्क्स यांना काही निधी पुरवला आणि त्यांच्यासोबत काम करण्याकरिता एक अतिरिक्त तंत्रज्ञ देखील दिला.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!