४२. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : आयबीएम अकांऊंटिंग मशिन : कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी

दरम्यान जॉन पॅटरसन यांच्याशी बेबनाव झाल्याने १९१३ सालच्या डिसेंबर महिन्यात वॉटसन यांना ‘एनसीआर कंपनी’मधून काढून टाकण्यात आले. त्यामुळे याकाळात वॉटसन काहीसे दुःखी व निराश झाले होते. परंतु एनसीआरमधून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी ‘कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी’ (CTR) येथे ‘जनरल मॅनेजर’चे पद स्विकारले. १९११ साली हर्मन हॉलरॅथ यांनी आपल्या कंपनीचे समभाग विकले, तेंव्हा त्यांच्या कंपनीचे इतर तीन कंपन्यांसोबत विलिनिकरण करण्यात आले होते. अशाप्रकारे चार कंपन्या एकत्र करुन ‘कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी’ (CTR) स्थापन केली गेली होती.

कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी

कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी

१९१५ साली थॉमस जे. वॉटसन यांच्या सुदैवाने त्यांचे कोर्टातील अपील ग्राह्य धरण्यात आले व त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून त्यांस दोषमुक्त केले गेले. खटल्यातून दोषमुक्त झाल्यानंतर वॉटसन यांना ‘सीटीआर कंपनी’त ‘प्रेसिडन्ट’ पदी बढती देण्यात आली. त्यावेळी हर्मन हॉलरॅथ त्या कंपनीत सल्लागाराची भूमिका बजावत होते. वॉटसन करत असलेले बदल त्यांना फारसे रुचत नसले, तरी वॉटसन यांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे ‘सीटीआर’ कंपनीचा मोठा फायदा झाला. त्यांनी सीटीआरमध्ये कामास सुरुवात केल्यानंतर केवळ चार वर्षांत कंपनीचा नफा दुपटीने वाढला. जुन्या यंत्रांचे आधुनिकीकरण केल्याने पुढे १९२० सालापर्यंत कंपनीच्या नफ्यात तिपटीने वृद्धी झाली.

अमेरिकेतील उद्योगधंदे व व्यवसाय वाढीस लागल्याने सीटीआरच्या यंत्रांना त्याकाळी चांगली मागणी मिळाली. परिणामी सीटीआरला बाजारपेठेचा बराच मोठा हिस्सा प्राप्त झाला. १९२४ साली वयाच्या ५०व्या वर्षी वॉटसन सीटीआर कंपनीचे ‘चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ बनले. त्यावेळी त्यांनी ‘कंप्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनी’चे (CTR) नाव बदलून ‘इन्टरनॅशनल बिझनेस मशिन्स’ (IBM) असे केले. तेंव्हापासूनच ‘आयबीएम’ या नावाचे संगणकाशी एक अतूट नाते निर्माण झाले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!