२५. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज

नाविण्याचा शोध घेणे ही मानवाची नैसर्गिक प्रेरणा आहे. तरी मानवी प्रेरणेस अर्थकारणाच्या व्यवहारिक चौकटीत बसवणे सहसा कसोटीचे ठरते. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. पण एकदा अंतःप्रेरणा व्यवहारिक कसोटीवर उतरली, की मानवी जीवनास नवे क्षितिज प्राप्त होते. औद्योगिकीकरणाच्या काळात संशोधक व्यापार्‍यांचे प्रश्न सोडवत होते अणि त्याबदल्यात व्यापारी संशोधनासाठी आवश्यक पैसे पुरवत होते. ती एकप्रकारची गुंतवणूक असायची. कारण संशोधनामुळे अनेक प्रश्न सुटायचे आणि त्यामुळे व्यापार्‍यांच्या व्यवसायात वृद्धी व्हायची.

तो वसाहतवादाचा काळ होता. जागतिक स्तरावरील व्यापारात वाढ झाल्याने तत्कालीन युरोपीय व्यापारी समृद्ध झाले. त्या अनुषंगाने बँकिंग, इन्स्युरन्ससारख्या वित्तिय व्यवस्था मजबूत झाल्या. या व्यवस्था सांभाळण्यासाठी नोकरदार वर्ग निर्माण झाला. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत मानवी गरजा सहज पूर्ण होऊ लागल्या. परिणामस्वरुप मानवास आपल्या जीवनाबद्दल विचार करण्यास वेळ मिळाला. तो आपल्या सामाजिक व राजकीय अवस्थेबद्दल प्रश्न विचारु लागला. वैचारिकतेतून जे सामाजिक परिवर्तन झाले, त्यातूनच कालबाह्य राजकीय व्यवस्थाही परावर्तित झाली. नवीन कायदे अंमलात आले. त्यायोगे मानवी जीवनास एकप्रकारची स्थिरता व सुरक्षितता प्राप्त झाली.

स्थिर व सुरक्षित जीवनात नाविण्यपूर्ण विचारांना चालना मिळाली. पूर्वापार चालत आलेल्या कामांमध्ये ‘विचार’ दिसू लागला. ‘हेच काम अधिक चांगल्याप्रकारे कसे करता येईल?’, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे परंपरागत चालत आलेल्या कामांमध्ये पद्धतशीरपणा आला. ‘कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षमतेने कसे करता येईल?’ या दिशेने विचार घडू लागता. यातूनच कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक वस्तूंची निर्मिती होऊ लागली.

टाईपरायटर आणि ॲडिंग मशिन

साल १८९६ : टाईपरायटर आणि ॲडिंग मशिन

आज संगणक हा कार्यालयीन कामकाजाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु संगणकाचे युग सुरु होण्यापूर्वीच कार्यालयीन कामकाजात यंत्रांचे महत्त्व वाढत होते. टाईपरायटर, ॲडिंग मशिन, इत्यादी उत्पादनांनी एका कार्यसंस्कृतीस जन्म दिला. त्यातून विक्रीसेवा व विक्रीपश्च्यात सेवा मिळू लागली, प्रशिक्षण संस्था उदयास आल्या, उत्पादनाच्या सुधारित आवृत्या निघू लागल्या. पुढे संगणक अवतरला, तेंव्हा तो देखील या रुजलेल्या कार्यसंस्कृतीचा एक घटक बनला. तेंव्हा मूळात ही कार्यसंस्कृती कशी निर्माण झाली? व ती संगणकास कशी पूरक ठरली? हे जाणून घेणे आगत्याचे ठरेल.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!