५०. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : कॉन्रॅड जुजा

ॲटनॅसऑफ यांचा संगणक गणिती सुत्र सोडवण्यास सक्षम असला, तरी तो ‘प्रोग्रॅमेबल संगणक’ नव्हता. अनेक लोक पहिल्या प्रोग्रॅमेबल संगणकाचे श्रेय कॉन्रॅड जुजा यांना देतात. त्यांनी आपल्या संगणकासाठी जगातील पहिली ‘प्रोग्रॅमिंग लँग्वेज’ देखील विकसित केली होती.

कॉन्रॅड जुजा यांचा जन्म १० जून १९१० रोजी जर्मनीतील बर्लिन या शहरात झाला. त्यांचे वडील टपाल खात्यात कारकून होते. जुजा यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दित मशिन कन्स्ट्रक्शन आणि स्थापत्यशास्त्र अशी दोन निरनिराळी क्षेत्रे आजमावून पाहिली. परंतु त्यांत त्यांचे मन रमले नाही. तेंव्हा १९३५ साली त्यांनी ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ची पदवी प्राप्त केली. पदवी मिळवल्यानंतर फोर्ड मोटार कंपनीत त्यांनी अल्पकाळ काम केले. त्यानंतर लगेच एका विमान कारखान्यात ‘डिझाईन इंजिनिअर’ म्हणून नोकरी पत्करली.

कॉन्रॅड जुजा

कॉन्रॅड जुजा

‘विमानाच्या पंखांवर हवेचा कसा परिणाम होतो?’ यानुषंगाने त्यांना नोकरीच्या ठिकाणी अनेक किचकट गणिते सोडवावी लागत असत. त्यांच्या सहकार्‍यांना देखील याच समस्येने भांडावून सोडले होते! तेंव्हा जुजा यांनी त्यावर विचार सुरु केला. गणित सोडवण्याच्या दृष्टिने जर एखादे अत्याधुनिक यंत्र तयार केले, तर त्यास आयतीच बाजारपेठ उपलब्ध असल्याचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. असे यंत्र तयार करायच्या निर्धाराने कॉन्रॅड जुजा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपले बस्तान आपल्या आई-वडिलांच्या घरी हलवले. गणित सोडवण्यासाठी आपण एक भव्य यंत्र तयार करत असल्याचे त्यांनी आपल्या आई-वडिलांना सांगितले. ‘यांत्रिक मेंदू’ तयार करायचा हे कॉन्रॅड जुजा यांनी अगदी मनोमन ठरवून टाकले होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्या आई-वडिलांनी व मित्रपरिवाराने याकामी त्यांस शक्य तेव्हढे आर्थिक सहाय्य केले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!