३०. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॉम्पटॉमिटर

१९व्या शतकाच्या अखेरीस उद्योग-व्यवसायास चांगलीच गती प्राप्त झाली होती. तेंव्हा वेगवान आकडेमोड करु शकेल अशी सुधारित ॲडिंग मशिन तयार करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न होऊ लागले. डॉर फेल्ट या २२ वर्षिय तरुणाने १८८४ साली त्याद्ष्टीने एक यंत्र तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या संकल्पनेस आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता फेल्ट यांनी शिकागोस्थित रॉबर्ट टॅरंट या उद्योजगाची मदत घेतली. अशाप्रकारे १८८९ साली ‘फेल्ट अँड टॅरंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ उदयास आली. फेल्ट यांनी आपल्या यंत्रास ‘कॉम्पटॉमिटर’ असे नाव दिले. सुरुवातीच्या दशकात या यंत्रास तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु २०व्या शतकाच्या प्रारंभी या यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली.

‘कॉम्पटॉमिटर’ हे मुख्यतः बेरजेवर आधारित असे यंत्र होते. पण विशेष कौशल्याचा वापर केला असता, या यंत्राच्या सहाय्याने वजाबाकी, गुणाकार, भागाकार देखील करता येत असत. संगणकाच्या कीबोर्डवर जशा अक्षरांच्या, अकांच्या आणि चिन्हांच्या ‘की’ (Keys) असतात; अगदी त्याचप्रमाणे कॉम्पटॉमिटरवर १ ते ९ या अंकांच्या ‘की’ होत्या. कॉम्पटॉमिटरच्या निमित्ताने एखाद्या ॲडिंग मशिनमध्ये प्रथमच ‘की’चा वापर करण्यात आला. या यंत्रावरील एकाहून अधिक ‘की’ या एकाचवेळी दाबता येत असत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगवान पद्धतीने आकडेमोड करता येऊ लागली.

कॉम्पटॉमिटर

कॉम्पटॉमिटर

टाईपरायटरप्रमाणेच ‘कॉम्पटॉमिटर’ हे यंत्र चालवण्यास प्रशिक्षणाची आवश्यकता होती. म्हणूनच ‘कॉम्पटॉमिटर ट्रेनिंग स्कूल’च्या माध्यमातून यासंदर्भातील प्रशिक्षण घ्यावे लागत असे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान कॉम्पटॉमिटरला मोठी मागणी होती. त्यामुळे अनेक तरुण मुला-मुलींचा कॉम्पटॉमिटर शिकण्याकडे ओढा होता. कॉम्पटॉमिटर चालवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्यावर अत्यंत वेगवान पद्धतीने काम करता येत असे. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात ‘कॉम्पटॉमिटर’ हे एक महत्त्वाचे यंत्र होते. अगदी १९६० पर्यंत या यंत्रात काळानुरुप सुधारणा होत गेल्या.

फेल्ट एक अत्यंत कल्पक व्यक्ती होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक निरनिराळ्या गोष्टी निर्माण केल्या. त्यासाठी त्यांना ५० हून अधिक पेटंट्स मिळाली. आपल्या जीवनाच्या अखेरच्या काही वर्षांत फेल्ट यांनी आपल्या पत्नीसाठी एक भव्य महाल बांधला. या महालाचा परिसर हा त्यावेळी शेकडो एकरांवर पसरला होता. आज हा महाल ‘दी फेल्ट मॅन्शन’ म्हणून ओळखला जातो.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!