५६. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिग्मा व कोलॉसिस : भाग २

इंग्लंडने ‘ब्लेचली पार्क’ येथे गणितज्ञ, आघाडीचे चेस खेळाडू, कोडी सोडवणारे लोक, अशी विविध क्षेत्रातील तल्लख बुद्धिची माणसे एकत्र बोलावली. त्यांच्यासमोर ‘इनिग्मा मशिन’चे रहस्य भेदण्याचे आव्हान ठेवण्यात आले. तिथे बोलावण्यात आलेल्या गणितज्ञांत ॲलन ट्युरिंग हे देखील होते. इनिग्मा मशिनविषयी अधिक माहिती मिळू लागली, तसे त्यामार्फत प्रसारित होणारे गुप्त संदेश वाचणे शक्य होऊ लागले. परंतु याकामाची गती जर वाढवायची असेल, तर त्यासाठी यंत्राचा वापर करणे गरजेचे होते. पोलिश लोकांनी यापूर्वीच त्याकरिता एक यंत्र विकसित केले होते. ट्युरिंग यांनी त्यात सुधारणा करत आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने एक अधिक चांगले यंत्र तयार केले. ते यंत्र त्यावेळी ‘बॉम्ब’ या नावाने ओळखले जाई. त्यांच्या या यंत्रामुळे महायुद्धारदम्यान दोस्त राष्ट्रांचे मोठे नुकसान टळले.

पुढे हिटलरने त्याच्या सेनाधिकार्‍यांना गुप्त संदेशवहनासाठी अधिक चांगले व सुरक्षित यंत्र विकसित करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर जर्मनीने ‘लॉरेंझ सायफर’ नावाचे यंत्र विकसित केले. टेलेप्रिंटरच्या माध्यमातून पाठवले जाणारे संदेश लॉरेंझ सायफरच्या सहाय्याने संकेतबद्ध केले जात. ॲडॉल्फ हिटलरसह जर्मनीच्या उच्चपदस्त अधिकार्‍यांदरम्यानचा संवाद हा अशाप्रकारे अत्यंत गुप्तपणे घडत असे. दोस्त राष्ट्रांच्या तज्ञांसमोर पुनःश्च मोठे आव्हान उभे राहिले! त्यावर उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी या पद्धतीविषयी मिळेल ती माहिती जमवली. त्यानंतर टॉमी फ्लॉवर नावाच्या अभियंत्याने आपल्या सहकार्‍यांसह ‘कोलॉसिस’ नावाचे यंत्र विकसित केले. त्यात त्यांनी व्हॅक्युम ट्युब्जचा वापर केला. कोलॉसिसला अनेकजण सुरुवातीच्या काळातील प्रोगॅमेबल इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक मानतात.

कोलॉसिस

कोलॉसिस

कोलॉसिसमुळे दोस्त राष्ट्रांना युद्धात आघाडी मिळू लागली. या यंत्राच्या मदतीने त्यांच्या कामाची गती कित्येक पटीने वाढीस लागली. आता त्यांना प्रत्यक्ष हिटलरमार्फत पाठवले जाणारे गुप्त संदेश वाचता येत होते. एकंदरीतच कोलॉसिसने महायुद्धाच्या काळात अगदी भरीव कामगिरी केली. महायुद्ध संपल्यानंतर कोलॉसिसवर काम करणार्‍या लोकांना तत्संबंधीची सर्व माहिती, कागदपत्रे नष्ट करुन टाकण्याची सुचना करण्यात आली. ही माहिती रशियाच्या हाती लागू नये अशी दोस्त राष्ट्रांची ईच्छा होती. कारण दुसरे महायुद्ध संपले असले, तरी सोव्हिएत युनिअन आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमधील तणाव हा त्यावेळी कायम होता.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!