नोंद घेण्यासाठी ‘गुगल कीप’चा वापर

विचार करता करता एखादी गोष्ट आपल्या लक्षात येते आणि मग आपण जर ती गोष्ट लगेच लिहून ठेवली नाही, तर अगदी पूर्णपणे विसरून जाते, आणि त्यानंतर पुन्हा आठवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी काही केल्या आठवत नाही. म्हणूनच एखादा विषय अथवा काम लक्षात आल्यानंतर ज्या त्या वेळी लिहून ठेवले, तर आपली कार्यक्षमता वाढू शकते. परंतु जेंव्हा जेंव्हा काही सुचते, तेंव्हा प्रत्येकवेळी आपल्या आसपास कागद आणि पेन असेलच असे नाही. तरी आजच्या काळात आपला स्मार्टफोन मात्र नेहमीच आपल्या सोबत असतो. त्यामुळे आपल्या मनातलं लिहून ठेवण्यासाठी, नोट्स घेण्यासाठी स्मार्टफोन मधील ‘गुगल कीप’ या प्रणालीचा वापर कसा करायचा? ते आज आपण पाहणार आहोत.

‘गुगल कीप’ ही स्वतः गुगलने तयार केलेली प्रणाली आहे आणि आपण ती ‘गुगल प्ले स्टोअर’ मधून आपल्या स्मार्टफोनवर मोफत स्थापित करू शकतो. ‘गुगल कीप’चा उपयोग करण्यासाठी आपणाला गुगलचे खाते वापरून त्यात प्रवेश करावा लागतो. त्यामुळे गुगल कीप अंतर्गत आपण ज्या काही नोंदी घेतो त्यांचा क्लाऊडवर मेळ (Sync) घातला जातो. अर्थात एका उपकरणावर घेतलेल्या नोंदी या आपण दुसऱ्या उपकरणावर पाहू शकतो. शिवाय आपला स्मार्टफोन जर खराब झाला, तर गुगल कीप मध्ये साठवलेला डेटा हा गुगलच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित राहतो. क्लाऊड तंत्रज्ञानाचा हा एक खूप मोठा फायदा आहे.

गुगल कीप

गुगल कीप

‘गुगल कीप’ ही प्रणाली आपल्या स्मार्टफोनवर स्थापित केल्यानंतर गुगलचे खाते वापरून त्यात प्रवेश करता येतो. नोंदी घेण्यासंदर्भातील सारे पर्याय आपणाला या प्रणालीच्या तळाशी दिसून येतील. या पर्यायांचा वापर करून आपण निरनिराळ्या प्रकारच्या नोंदी घेऊ शकतो. उदाहरणार्थ, आपणाला जर सामानाची यादी तयार करायची असेल, तर आपण ‘चेकबॉक्स’च्या पर्यायाचा वापर करू शकतो किंवा आपणाला जर एखादे चित्र रेखाटायचे असेल, तर आपण ‘ड्रॉइंग’च्या पर्यायाची निवड करू शकतो. आता आपण हे पर्याय एकेक करून पाहू. ‘गुगल कीप’ या प्रणालीच्या डाव्या बाजूस तळाशी सर्वप्रथम पर्याय आहे तो ‘Take a note’चा! Take a noteवर स्पर्श करून आपणाला एक सर्वसाधारण नोंद तयार करता येते, ज्यामध्ये आपण आपले विचार किंवा एखादी आठवण लिहून ठेवू शकतो. त्यानंतर पुढचा पर्याय आहे तो Tick boxesचा, जो वापरून आपण कोणत्याही प्रकारची यादी तयार करू शकतो. शेजारी चित्र रेखाटण्यासाठी Drawingचा पर्याय आहे, तर श्राव्यनोंद घेण्यासाठी Recordingची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या नोंदींमध्ये आपण फोटो देखील जोडू शकतो. त्यासाठी imageचा पर्याय निवडून आपल्या नोंदीमध्ये फोटो जोडावा आणि त्यानंतर त्या फोटोच्या अनुषंगाने जो काही मजकूर असेल तो लिहावा.

गुगल कीप मधील नोंद

गुगल कीप मधील नोंद

समजा आपल्या नोंदीमध्ये आपण एखादे काम लिहून ठेवले असेल, तर भविष्यात त्या कामाची आठवण राहावी म्हणून आपण त्या नोंदीला Reminder देऊ शकतो, जेणेकरून आपला स्मार्टफोन आपल्याला योग्य वेळी आपल्या कामाची आठवण करून देईल. बाकी labelच्या साहाय्याने आपण आपल्या नोंदींची निरनिराळ्या प्रकारांमध्ये वर्गवारी करू शकतो. उदाहरणार्थ ,आपण आपल्या नोंदींमध्ये जर निरनिराळ्या पदार्थांची पाककृती लिहून ठेवली, आणि पाककृतीशी निगडीत प्रत्येक नोंदीला ‘पाककृती’ असे label दिले, तर गुगल कीप मधील सर्व प्रकारच्या नोंदींच्या गर्दीतून भविष्यात आपणाला या लेबलच्या साहाय्याने पाककृतीशी निगडीत साऱ्या नोंदी अगदी सहज एकत्र सापडू शकतील. याशिवाय नोंदींमधील वेगळेपण कळावे यासाठी आपण गुगल कीप मधील नोंदींना निरनिराळ्या रंगाच्या साहाय्याने रंगांकीत देखील करू शकतो.

गुगल कीप पर्याय

गुगल कीप पर्याय

काही नोंदींचा उपयोग संपलेला असतो, परंतु भविष्यात संदर्भासाठी त्या कदाचित आपणाला लागू शकतात. अशा नोंदींचा आपणाला तूर्तास उपयोग नसतो, पण आपण त्या थेट नष्टही करू शकत नाही. म्हणूनच अशा नोंदीसाठी Archiveचा पर्याय देण्यात आलेला आहे. अशाने एखादी नोंद Archive केल्यानंतर ती गुगलच्या मुख्य इंटरफेस मध्ये दिसत नाही, मात्र गुगल कीपच्या Archive विभागात मात्र ती सुरक्षित राहते. ‘गुगल कीप’च्या माध्यमातून घेतलेली एखादी नोंद जर आपणाला मित्र, सहकारी किंवा कुटुंबियांसोबत सामायिक करायची असेल, तर त्यासाठी नोंदींच्या पर्यायात Sendचा पर्याय देण्यात आलेला आहे. एकंदरीत सांगायचे झाले, तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या डोक्यावरचे ओझे हलके करणारे गुगल कीप हे एक सोपे ॲप आहे, जे प्रत्येकाने नक्कीच वापरून पहायला हवं.

Advertisements
error: Content is protected !!