कृत्रिम बुद्धिमत्तेचे वितरण नक्की कशाप्रकारे करायचे? हे जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत गुगलने चेहरा ओळखणारे आपले तंत्रज्ञान न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाईलच्या स्क्रीनचे कुलूप उघडण्यापासून ते हरवलेल्या व्यक्ती शोधण्यापर्यंत चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होतो. पण असे असले तरी इतर संस्थांना हे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यापूर्वी त्याचे भविष्यातील परिणाम पडताळून पाहायला हवेत असे गुगलला वाटते.

चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान

मध्यंतरी अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांनी चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान अमेरिकी सरकारला पुरवल्याबद्दल कंपनी विरोधात बंड पुकारले होते. दुसरीकडे आपला पाठलाग करणाऱ्यांना हेरण्यासाठी पॉप स्टार टेलर स्विफ्ट यांनी नुकताच या तंत्रज्ञानाचा वापर केला होता, तेंव्हा त्यांच्यावर देखील टीका झाली होती.

मानवी हक्क आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून या तंत्रज्ञानाला विरोध होत आहे. हे सारे लक्षात घेता या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होऊ नये अशी गुगलची इच्छा आहे, आणि त्यासाठी भविष्याच्या दिशेने त्‍यांना काळजीपूर्वक पावले टाकायची आहेत.

Advertisements
error: Content is protected !!