६५. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : गोल्डस्टाईन आणि नॉयमन यांची भेट

१९४४च्या उन्हाळ्यात हर्मन गोल्डस्टाईन एकदा फिलाडेल्फियाला जाणार्‍या रेल्वेची वाट पहात प्लॅटफॉर्मवर उभे होते. तिथे त्यांची जॉन वॉन नॉयमन यांच्याशी अगदी योगायोगाने भेट झाली. वॉन नॉयमन हे एक अत्यंत प्रख्यात गणितज्ञ होते. निरनिराळ्या क्षेत्रांत आपली छाप पडावी असा त्यांना मनोमन वाटत असे. त्यांनी क्वांटम मेकॅनिक्सशी निगडित मूलभूत गणिताची मांडणी केली होती. त्यामुळे सबंध जगात त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. प्रिन्स्टन येथे अल्बर्ट आईन्स्टाईन व इतर काही विख्यात गणितज्ञ त्यांचे सहकारी होते. वॉन नॉयमन मूळतः हंगेरीहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. परंतु तरीही अमेरिकेच्या सरकारी व्यवस्थेत त्यांना मोठा मान होता. अनेक युद्धकालीन प्रकल्पांवर त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एकंदरितच जॉन वॉन नॉयमन यांचे व्यक्तीमत्त्व मोठे होते. त्यामुळे त्यांची अशी अनपेक्षित भेट झाल्याने गोल्डस्टाईन अगदी भारावून गेले.

हर्मन गोल्डस्टाईन आणि जॉन वॉन नॉयमन

हर्मन गोल्डस्टाईन आणि जॉन वॉन नॉयमन

गोल्डस्टाईन आणि वॉन नॉयमन यांच्यात सहज म्हणून गप्पा सुरु झाल्या. वॉन नॉयमन यांचे बोलणे मनमिळाऊ होते. बोलता बोलता त्यांनी गोल्डस्टाईन यांना त्यांच्या कामाबद्दल विचारले. गोल्डस्टाईन यांनी आपण एका वेगवान इलेक्ट्रॉनिक संगणकावर काम करत असल्याचे त्यांना सांगितले. वॉन नॉयमन यांना त्या विषयात रुची वाटली. कारण ते त्यावेळी अणूबाँब प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम करत होते आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने त्यांना अशाप्रकारचा वेगवान संगणक गरजेचा वाटत होता. अणूबाँबचा प्रकल्प गुप्त असल्याने गोल्डस्टाईन यांना त्यावेळी त्याबाबत काही कल्पना नव्हती. वॉन नॉयमन यांनी गोल्डस्टाईन यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक संगणकाबाबत अधिक माहिती घेतली. तेंव्हा गोल्डस्टाईन यांनी वॉन नॉयमन यांची इनिॲक प्रकल्पासाठी भेट सुनिश्चित केली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!