३२. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : कॅश रजिस्टर

नॅशनल कॅश रजिस्टरची कथा जेम्स रिटी यांच्यापासून सुरु होते. ऐन तारुण्यात रिटी यांनी अमेरिकन गृहयुद्धात सहभाग नोंदवला होता. युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी दारुचे एक सलून उघडले. परंतु त्या सलूनमध्ये काम करणारे काही नोकर ग्राहकांकडून मिळालेले पैसे परस्पर लाटत असत. त्यामुळे रिटी यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागत होते. एकदा ते समुद्रमार्गे युरोपच्या प्रवासावर निघाले. तेंव्हा त्यांना जहाजावर एक वैशिष्टपूर्ण असे यंत्र दिसले. जहाजाच्या तळाशी जहाजाला पुढे ढकलण्यास सहाय्य करणारा एक पंखा असतो. हा पंखा एकंदरीत किती वेळा फिरला? याची नोंद जहाजावरील ते यंत्र ठेवत होते. त्या यंत्राचे कार्य पाहून रिटी यांना एक कल्पना सुचली. त्यातून त्यांना एक पूर्णतः नवे यंत्र बनवण्याची प्रेरणा मिळाली.

आपल्या दुकानातील दैनंदिन व्यवहाराची नोंद रहावी अशी रिटी यांची ईच्छा होती. तेंव्हा अमेरिकेस परतताच त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. रिटी यांचे बंधू एक मेकॅनिक होते. त्यामुळे याकामी त्यांनी आपल्या भावाची मदत घेतली. मनासारखे यंत्र तयार करण्यासाठी त्यांस बरेच कष्ट घ्यावे लागले. परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न करुन रिटी यांनी आपली कल्पना अखेर प्रत्यक्षात उतरवली. १८७९ साली त्यांनी आपल्या शोधाचे पेटंट घेतले. रिटी यांचे यंत्र विक्रीच्या व्यवहाराची कौशल्याने नोंद करु शकत असे. परंतु सुरुवातीला त्यांच्या यंत्रात पैसे जमा करुन ठेवता येतील असा गल्ला नव्हता.

जेम्स रिटी यांचे पहिले कॅश रजिस्टर

जेम्स रिटी यांचे पहिले कॅश रजिस्टर

पेटंट घेतल्यानंतर जेम्स रिटी यांनी एक छोटासा कारखाना उघडून ‘कॅश रजिस्टर’ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या कंपनीस ‘जेम्स रिटीज्‌ न्यू कॅश रजिस्टर अँड इंडिकेटर’ असे नाव दिले. पण इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे समकालिन लोकांना कॅश रजिस्टरचे महत्त्व चटकन लक्षात आले नाही. शिवाय एकाहून अधिक उद्योग सांभाळणे ही रिटी यांच्याकरिता जणू तारेवरची कसरत ठरत होती! त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वीच्याच व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले व कॅश रजिस्टरचा आपला हा व्यवसाय विकून टाकला. पुढे १८८४ साली रिटी यांच्या कंपनीचे ‘नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी’ असे नामांतरण करण्यात आले. तेंव्हा जॉन पॅटरसन हे या कंपनीचे मुख्य मालक म्हणून काम पहात होते. एखादी वस्तू कशी विकावी? याचा वस्तुपाठ पुढे जॉन पॅटरसन यांनी जगासमोर घालून दिला. आयबीएम कंपनीला उत्कर्षावर नेणारे थॉमस जे. वॉटसन हे देखील त्यांना आपला आदर्श मानत असत.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!