३३. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन

१३ डिसेंबर १८४४ रोजी जॉन हेन्री पॅटरसन यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अमेरिकन क्रांती युद्धात जॉर्ज वॉशिंगटन यांच्या नेतृत्त्वाखाली लढले होते. जॉन यांच्या वडीलांचा लाकूड कापण्याचा कारखाना होता, शिवाय धान्य दळून देणारी गिरणी देखील होती. सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना जॉन आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्यावेळी जॉन यांचे बंधू गृहयुद्धात सहभागी झाले होते. त्यामुळे घरी कामात मदत करण्याकरिता जॉन यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अमेरिकन गृहयुद्ध शिगेला पोहचले, त्यावेळी एब्रॅहम लिंकन यांनी नागरिकांना १०० दिवस सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. तेंव्हा एब्रॅहम लिंकन यांच्या आवाहनाला साद देत जॉन पॅटरसन १०० दिवस सैन्यात भरती झाले. गृहयुद्ध संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात प्रवेश मिळवला. महाविद्यालयीन सुट्टी दरम्यान शिकवण्याचे काम करुन ते आपला स्वतःचा खर्च उचलत असत. अशाप्रकारे वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी शैक्षणिक पदवी प्राप्त केली.

जॉन पॅटरसन

जॉन पॅटरसन

शिक्षण घेऊन परतल्यानंतर जॉन पॅटरसन यांनी शहरात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मनासारखी नोकरी मिळाली नाही. तेंव्हा पुढील दोन वर्षं त्यांनी आपल्या शेतात काम केले. पॅटरसन यांना व्यवसाय करण्याची ईच्छा होती, परंतु आपण घेतलेले महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायास पुरक नाही असे त्यांना वाटत होते. शेतात काम करुन आपण आपली योग्यता व वेळ निरर्थक वाया घालवत आहोत, असा अगदी तारुण्यसुलभ विचार त्यांच्या मनात आला. तेंव्हा त्यांनी पुनःश्च नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. काहीकाळ शालेय शिक्षक म्हणून काम केल्यानंतर लागलीच त्यांना टोल कलेक्टरची नोकरी मिळाली. टोल कलेक्टरचे काम थकवणारे होते. कालव्यामधून जाणार्‍या जहाजांकडून त्यांस टोल गोळा करावा लागत असे. त्यासाठी त्यांना सतत तत्पर रहावे लागत होते. अखेर हे काम फारसे व्यवहारी नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर व्यवसाय चाचपडण्यास सुरुवात केली. तो औद्योगिकीकरणाचा सुरुवातीचा काळ होता. उर्जेचे साधन म्हणून त्याकाळी कोळश्याचा प्रामुख्याने वापर होत होता. कोळश्याच्या व्यवहारात संधी आहे हे ओळखून पॅटरसन यांनी कोळश्याचा व्यापार करण्याचे ठरवले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!