३४. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन – भाग २

पॅटरसन यांनी आपल्या एका मोठ्या भावाला सोबत घेऊन कोळश्याचा व्यापार सुरु केला. कोळश्याच्या व्यापारात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी टोल कलेक्टरचे काम सोडून दिले. पॅटरसन यांचे काम अगदी चोख असे. आपण पुरवत असलेला कोळसा दर्जेदार असावा यावर त्यांचा कटाक्ष होता. कंपनीच्या जाहिरातींवर ते सढळ हस्ते खर्च करत. कंपनीचे मालक असूनही ते स्वतः अनेकदा ग्राहकाच्या घरी जाऊन कोळश्याबद्दल माहिती देत. पॅटरसन यांचे मोठे बंधू मात्र काहीसे जुन्या वळणाचे होते. त्यांना पॅटरसन यांची कार्यपद्धती फारशी मान्य नव्हती. त्यामुळे दोन्ही भावांनी स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा पॅटरसन यांनी आपल्या दुसर्‍या एका भावास सोबत घेऊन एक नवी कंपनी स्थापन केली. त्यानंतर त्यांचा व्यवसाय अधिक बहरला. त्यांनी स्वतः काही कोळसा खाणी भाडेतत्त्वावर घेतल्या.

अमेरिकन रेलरोड

अमेरिकन रेलरोड

त्याकाळी अमेरिकेतील रेल्वेजाळे अधिकाधिक विस्तृत होत होते. त्यामुळे कोळसा वाहतुकीची चांगली सोय निर्माण झाली होती. व्यवसाय चांगला चालत असला, तरी पॅटरसन यांना आपल्या व्यवसायातून म्हणवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे आपली कुठेतरी फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेम्स रिटी यांनी याकरिता नुकतेच एक यंत्र विकसित केले असल्याचे पॅटरसन यांना कानोकानी समजले. व्यवहारांत पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी जेम्स रिटी यांनी निर्माण केलेले तीन ‘कॅश रजिस्टर’ लागोलाग विकत घेतले. त्यामुळे ‘कॅश रजिस्टर’ विकत घेणार्‍या पहिल्या काही ग्राहकांत पॅटरसन यांचा समावेश होता असे म्हणता येईल. कॅश रजिस्टरचा वापर केल्याने कारकुनामार्फत केली जाणारी व्यवहारिक खोट पॅटरसन यांच्या ध्यानात आली. त्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायात मोठा फायदा दिसू लागला. त्याचवेळी कॅश रजिस्टरचे महत्त्व पॅटरसन यांना पुरते समजले! दरम्यान स्थानिक हितसंबंध आड येऊ लागल्याने पॅटरसन यांनी आपला कोळश्याचा व्यवसाय विकून टाकला होता. त्यामुळे ते स्वतः नवीन व्यवसायाच्या शोधात होते.

कॅश रजिस्टर

कॅश रजिस्टर

जॉन पॅटरसन हे एक चांगले व्यवसायिक होते. लोकांना बोलतं करुन ते त्यांच्या गरजा जाणून घेत असत. प्रत्येक व्यक्तीकडून ते काही ना काही आत्मसात करत रहात. एकदा एक व्यवसायिक तब्बल दोन महिने सुट्टी घेत असल्याचे त्यांस बोलता बोलता समजले. तेंव्हा एखादी व्यक्ती आपल्या व्यवसायापासून एव्हढा काळ कशी काय दूर राहू शकते? याचे त्यांना आश्चर्य वाटले! त्या व्यक्तीने आपण कॅश रजिस्टर नावाचे यंत्र वापरत असल्याचे मोठ्या विश्वासाने सांगितले. पॅटरसन यांचा कॅश रजिस्टरबाबतचा व्यक्तिगत अनुभवही चांगला होता. तेंव्हा त्यांना या यंत्रात भविष्य दिसू लागले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!