३८. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : जॉन पॅटरसन : योगदान

बाजाराचा सूक्ष्मतेने आभ्यास करण्याकरिता पॅटरसन यांच्या कंपनीमार्फत एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला होता. यात ग्राहकांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या जात व त्यानुसार पुढे उत्पादनात सुधारणा करण्यात येत असे. १९२२ सालापर्यंत एनसीआर कंपनीने लाखो कॅश रजिस्टर विकले होते. यावरुनच जॉन पॅटरसन यांची व्यवसायिक जाण व चातुर्य सिद्ध होते. चौकसता, दूरदृष्टी, सद्भावना, शिस्त आणि परिश्रम या जोरावर त्यांनी अगदी शून्यातून विश्व उभारले. व्यवसाय वृद्धिंगत करत असताना त्यांस आपल्या सामाजिक दायित्त्वाचा कधीही विसर पडला नाही. त्यांनी गरजू लोकांसाठी, लहान मुलांसाठी अनेकानेक उपक्रम राबवले, त्यांच्या उन्नतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. १९२२ साली वयाच्या ८८व्या वर्षी जॉन पॅटरसन यांचे निधन झाले. त्यांच्या माघारी त्यांच्या मुलाने नॅशनल कॅश रजिस्टर कंपनीची धुरा हाती घेतली.

१९११ सालचे नॅशनल कॅश रजिस्टर

१९११ सालचे नॅशनल कॅश रजिस्टर

संगणकाच्या निर्मिती प्रक्रियेत जॉन पॅटरसन यांचे थेट योगदान होते असे म्हणता येणार नाही. परंतु ज्या मार्गावरुन संगणक उद्योगाची व्यवहारिक वाटचाल झाली, तो बर्‍याच अंशी जॉन पॅटरसन यांनी आखून दिला होता असे म्हणता येईल. बाजाराचा आभ्यास करणे, लोकांच्या गरजा जाणून घेणे, विक्रेत्यांस त्यानुसार प्रशिक्षण देणे, आपल्या उत्पादनात सुधारणा करत राहणे, कामगारांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे, अशा अनेक गोष्टींकडे पॅटरसन यांनी लक्ष पुरवले व त्यांस विचारपूर्वक आकार दिला. पॅटरसन यांच्या तालमीतून बाहेर पडलेल्या व्यक्तीस तत्कालीन कंपन्यांमध्ये मोठी मागणी असे. थॉमस वॉटसन सिनिअर यांनी देखील ‘एनसीआर’मधील आपल्या अनुभवाचा पुढे ‘आयबीएम’मध्ये पुरेपूर वापर केला. त्यामुळेच आयबीएम कंपनी संगणक विश्वातील एक मोठा तारा बनून उदयास आली. वॉटसन यांच्या या कंपनीने पुढे संगणक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!