५८. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : इनिॲक व एडवॅक : जॉन मॉकली

३० ऑगस्ट १९०७ रोजी जॉन विल्यम मॉकली यांचा जन्म झाला. जॉन यांच्या घरातील शैक्षणिक वातावरण चांगले होते. त्यांचे पणजोबा स्वित्झर्लंडहून अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पिएचडी पूर्ण केले. पृथ्विच्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित संशोधनामुळे त्यांच्या वडिलांस प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. शालेय जीवनातच जॉन यांनी आपल्या कुशाग्रतेची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९२५ साली त्यांनी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तिथे ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ शिकण्याकरिता त्यांस शिष्यवृत्ती मिळाली होती. परंतु लवकरच त्यांना त्या विषयाचा कंटाळा आला. म्हणून त्यांनी भौतिकशास्त्र विभागात आपली बदली करुन घेतली. इथे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. १९२८ साली जॉन यांच्या वडिलांचे निधन झाले. तेंव्हा शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीची त्यांस मोठी मदत झाली. १९३० साली जॉन मॉकली यांचा विवाह झाला व पुढे त्यांना दोन मुले झाली. १९३२ साली त्यांनी भौतिकशास्त्रात पिएचडी प्राप्त केली.

पदवी मिळवल्यानंतर जॉन मॉकली यांनी त्याच महाविद्यालयात ‘रिसर्च असिस्टंट’ म्हणून वर्षभर काम केले. तेथील संशोधनादरम्यान त्यांना बरीच आकडेमोड करावी लागत असे. ही आकडेमोड किचकट असल्याने त्यात त्यांचा बराच वेळ निघून जाई. यातूनच त्यांच्या मनात ही सारी आकडेमोड करु शकेल अशा यंत्राची कल्पना घोळू लागली. १९३३ साली महामंदी आपल्या शिखरावर होती. सहजासहजी नोकरी मिळविणे दुरापास्त झाले होते. तरी जॉन मॉकली यांना एका महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुखपद मिळाले. नोकर्‍यांची संख्या घटली असल्याने त्या विभागात फारसे कोणी कामाला नव्हते. भौतिकशास्त्र विभागाचा कार्यभार हा बहुतकरुन मॉकली यांनाच वाहावा लागत होता. अशाने मॉकली यांना आपल्या संशोधनाकडे लक्ष पुरवणे कठीण बनले. तरी देखील वेळात वेळ काढून ते आपले संशोधन करत होते. एखादी गोष्ट अशक्य असल्याचे जर मॉकली यांना कोणी म्हटले, तर मॉकली यांना ते जणू एक आव्हान वाटत असे. मग ते स्वतः त्या गोष्टीत रस घेऊन समस्या सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करत असत.

जॉन मॉकली

जॉन मॉकली

जॉन मॉकली यांचे सुरुवातीचे संशोधन ‘मॉलेक्युलर फिजिक्स’शी निगडीत होते. पुढे १९३६ ते १९३८ दरम्यान त्यांनी ‘सोलार डाग’ व ‘पृथ्विचे चुंबकीय क्षेत्र’ यासंदर्भातील विश्लेषणात रस घेतला. त्यांच्या वडिलांनी पूर्वी याच क्षेत्रात काम केले होते. त्यामुळे त्यांना याविषयी विशेष आस्था होती. पण विश्लेषणाकरिता उपलब्ध होणारी माहिती एका विशिष्ट संस्थेच्या आखत्यारित येत होती. दुसरीकडे सरकारकडून उपलब्ध होणारी हवामान विषयक माहिती मात्र सर्वांसाठी खुली होती. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी ‘हवामान’ व ‘वातावरण’ या विषयांशी निगडीत संशोधन हाती घेतले. जॉन मॉकली यांना आता संशोधनाकरिता आवश्यक माहिती मिळू लागली, परंतु या माहितीच्या विश्लेषणाकरिता त्यांस मोठी आकडेमोड करावी लागत असे. आपल्या कामाची गती व व्याप्ती वाढावी या उद्देशाने त्यांना संगणकासारख्या यंत्राची विशेष आवश्यकता जाणवू लागली. याच गरजेतून त्यांनी गणना करणारे एक ‘ॲनॅलॉग यंत्र’ विकसित केले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!