४४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : जॉन विंसेंट ॲटॅनॅसऑफ

४ ऑक्टोबर १९०३ रोज जॉन विंसेंट ॲटॅनॅसऑफ यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल ते स्वतः १३ वर्षांचे असताना बल्गेरियाहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. जॉन यांचे वडिल ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअर’ होते, तर त्यांची आई गणिताची शिक्षिका होती. ‘इलेक्ट्रॉनिक संगणक’ तयार करण्याकरिता या दोन्ही कौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने जॉन यांना अगदी बालपणापासूनच पुरक वातावरण मिळाले असे म्हणता येईल.

वयाच्या पाचव्या वर्षी जॉन यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. साधारण महिनाभर शाळेत गेल्यानंतर एकदा त्यांच्या आईने त्यांस वाचून दाखवण्यास सांगितले. त्यांचे वाचन ऐकून त्यांच्या आईने त्यांस स्वतःच शिकवायचे ठरवले. जॉन यांना अगदी सुरुवातीपासूनच गणितात रस होता. लवकरच ते स्लाईडरुलच्या सहाय्याने सर्वसाधारण गणिते सोडवू लागले. ‘एखादी गोष्टी नक्की कशी काम करते?’ याचा मागोवा घेण्याची त्यांच्यात आंतरिक उर्मी होती. जॉन यांना इलेक्ट्रिकल गोष्टींमध्येही चांगली गती होती. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी घरातील लहान-सहान इलेक्ट्रिकल वस्तू दूरुस्त करण्यास सुरुवात केली. याच सुमारास त्यांच्या आईने त्यांस ‘एखादा अंक बायनरी पद्धतीने कसा मांडावा?’ हे शिकवले. पुढे जाऊन जॉन यांनी आपला ‘इलेक्ट्रॉनिक संगणक’ तयार केला. तेंव्हा त्यात ही पद्धत कळीची ठरणार होती.

काही गोष्टी आपल्यासाठी स्वयंसिद्ध असतात. त्यासाठी कोसलीही पोचपावती लागत नाही. दैवी जाणिवा आपल्याकडून त्यानुसार कार्य करवून घेत असतात. भविष्यात संगणकाची रचना आपल्यालाच करावी लागणार आहे याची ॲटॅनॅसऑफ यांना एकदा आपल्या अंतरात्म्यातून जाणिव झाली. जेंव्हा त्यांस पहिल्याप्रथम ही अनुभूती प्राप्त झाली, तेंव्हा उर्जातरंगांनी त्यांचे शरीर थरारु लागले. तत्क्षणी त्यांच्याजवळ काही नसले, तरी त्यांना आत्मिक जाणिवेतून हे माहित होते की, त्यांना याकरिता हव्या त्या गोष्टी मिळत जातील.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!