२६. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : रेमिंग्टन टाईपरायटर : कीबोर्ड

१७१४ साली हेन्री मिल यांनी टाईपरायटरसदॄश यंत्र तयार केल्याची ओझरती माहिती ब्रिटनमधील एका पेटंटमध्ये आढळते. त्यानंतर १९व्या शतकाच्या पूर्वार्धात टाईपरायटर विकसित करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्याकाळी ‘रायटर’ किंवा ‘कॉपिईस्ट’मार्फत कामकाजाची कागदपत्रे लिहून काढली जात असत. पण त्यांचे हस्ताक्षर ओळखणे हे देखील अनेकदा एक वेगळेच काम असे! त्यामुळेच टाईपरायटरसारख्या यंत्राची खर्‍या अर्थाने गरज होती. पण त्यावेळच्या टाईपरायटरची गती कमी असल्याने एखादा मजकूर हाताने लिहून काढणे अधिक सोयीचे ठरत होते. म्हणूनच सुरुवातीच्या काळात टाईपरायटर्सना अपेक्षित असा प्रतिसाद मिळू शकला नाही. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र ही परिस्थिती पालटू लागली.

हान्सेन रायटिंग बॉल

हान्सेन रायटिंग बॉल

१८७० साली ‘हान्सेन रायटिंग बॉल’ नावाचे यंत्र व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आले. या टाईपराईटरच्या सहाय्याने एखाद्या लेखनिकाहून अधिक गतीने लिहिता येत होते. पण याआधारे केवळ मोठी इंग्लिश अक्षरे टाईप करता येत होती. पुढील दशकभर हान्सेन आपल्या यंत्रात सुधारणा करत राहिले. त्याकाळी युरोपमध्ये लोकप्रिय झालेले हे यंत्र काही कार्यालयांत वापरले गेल्याचे उल्लेख आढळतात.

ख्रिस्तोफर शोल्स यांचा टाईपरायटर

साल १८६७ : ख्रिस्तोफर शोल्स यांचा टाईपरायटर : पहिला कीबोर्ड

आज संगणकाच्या कीबोर्डवर अक्षरांची जी रचना दिसते, त्यास QWERTY कीबोर्ड लेआऊट असे म्हणतात. यात Q, W, E, R, T, Y ही अक्षरे कीबोर्डच्या वरील रांगेत दिसून येतात. यामागील कारण हे ख्रिस्तोफर शोल्स यांनी तयार केलेल्या टाईपरायटरमध्ये दडलेले आहे. १८६७ साली ख्रिस्तोफर शोल्स यांनी एक टाईपरायटर विकसित करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टाईपरायटरसाठी तयार करण्यात आलेल्या कीबोर्डवरील अक्षरे ही A, B, C, D, E, F अशी क्रमाने होती. परंतु D आणि E सारखी वारंवार वापरात येणारी अक्षरे जवळ-जवळ येत असल्याने टाईपरायटरच्या कामात समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यांनी कीबोर्डवरील अक्षरांची रचना बदलली. ही बदललेली रचना त्यानंतर सर्वत्र मान्यताप्राप्त झाली व त्यानंतर गरज नसतानाही व्यवहारिक कारणांनी टिकून राहिली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!