२४. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : दी टॅब्युलेटिंग मशिन कंपनी

दरम्यान आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा याकरिता हॉलरॅथ इतर शक्यताही पडताळून पहात होते. त्या अनुषंगाने त्यांनी अमेरिकेतील प्रमुख इन्श्युरन्स कंपन्यांना अपल्या यंत्राचे महत्त्व पटवून दिले. औद्योगिकरणाच्या वाढीसोबतच त्याकाळी रेल्वे उद्योगही भरभराटीला आला होता. हॉलरॅथ यांनी ‘न्यूयॉर्क सेंट्रल रेल रोड’ला आपले यंत्र वापरुन पाहण्याबाबत सुचवले. त्यादृष्टीने त्यांनी आपली काही यंत्रेही त्यांस वापरायला दिली. पण रेल्वेचा हिशेब यशस्वीरित्या सांभाळण्यात त्यांच्या यंत्राला अपयश आले. हॉलरॅथ यांचे यंत्र हे जनगणनेच्या कामासाठी तर उपयुक्त होते, पण रेल्वेचे काम करण्याइतपत ते गतीमान नव्हते. अशाने हॉलरॅथ यांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांना पैशांची इतकी अडचण होती की, त्यांस आपले कुटूंब सासरी हलवावे लागले. शिवाय त्यांना आपला घोडाही विकावा लागला. हॉलरॅथ यांनी आपली उर्वरित जमासंपत्ती विकून काही पैसा उभा केला. या पैशांतून त्यांना आपल्या यंत्रात सुधारणा करायच्या होत्या आणि त्या यंत्राची गती व एकंदरित कार्यक्षमता वाढवायची होती. यासाठी हर्मन हॉलरॅथ यांनी साधारण वर्षभर अहोरात्र काम केले. त्यांनी आपल्या यंत्रात उद्योग-व्यवसायास अनुरुप अशा सुधारणा घडवल्या; सोबतच ‘कीपंच’चा शोध लावला, ज्यास आपण आजच्या ‘कीबोर्ड’ची पुरातन आवृत्ती म्हणू शकतो. अशाप्रकारे हर्मन हॉलरॅथ यांनी ‘डेटा प्रोसेसिंग’च्या क्षेत्रात मुलभूत कार्य केले. त्यांच्यामुळे भविष्यकालिन संगणकाचा पाया रचला गेला.

हॉलरॅथ इलेक्ट्रिक टॅब्युलेटर

साल १९०८ : हॉलरॅथ इलेक्ट्रिक टॅब्युलेटर : अमेरिकेचा जनगणना विभाग

आपल्या यंत्रात सुयोग्य अशा सुधारणा केल्यानंतर हॉलरॅथ यांनी पुन्हा एकदा ‘न्यूयॉर्क सेंट्रल रेल रोड’शी संपर्क साधला. त्यांनी आपले सुधारित यंत्र त्यांस एक वर्षाकरिता मोफत वापरण्यास दिले. पण केवळ तीन महिन्यांतच ‘न्यूयॉर्क सेंट्रल रेल रोड’ला त्या यंत्राची कार्यक्षमता जाणवली. त्यामुळे त्यांनी हॉलरॅथ यांची नवी यंत्रे भडेतत्त्वावर वापरण्यास घेतली. हॉलरॅथ यांच्यासाठी हे एक मोठे यश होते. यामुळे त्यांस विविध प्रकारची अनेक कामे मिळाली. तत्कालीन परिस्थितीत जी गरज निर्माण झाली होती, त्याची अशाप्रकारे त्यांनी यशस्वी पूर्तता केली.

पण या सर्व धावपळी दरम्यान हॉलरॅथ यांची प्रकृती खालावली. त्यांना हृदयविकाराचा त्रास जडला. त्यातच इतर संशोधकांनी हॉलरॅथ यांच्या यंत्राहून अधिक सुधारित असे यंत्र तयार करण्यास सुरुवात केली. १९१० सालची जनगणना ही अशाच एका सुधारित यंत्राद्वारे केली गेली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन १९११ साली हर्मन हॉलरॅथ यांनी ‘दी टॅब्युलेटिंग मशिन कंपनी’मधील आपले समभाग १० लाखांहून अधिक डॉलरला विकून टाकले. त्यानंतर त्यांच्या कंपनीचे इतर तीन कंपन्यांसोबत विलिनीकरण करण्यात आले. या विलिनीकरणानंतर निर्माण झालेल्या नव्या कंपनीसाठी हॉलरॅथ यांनी पुढील १० वर्षं सल्लागार म्हणून काम केले. अखेर १९२९ साली हर्मन हॉलरॅथ यांचे वयाच्या ६९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!