५४. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन : भाग २

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲलन ट्युरिंग यांनी केंब्रिज विद्यापिठातील गणिताच्या शाखेत प्रवेश मिळवला. तेथील वातावरण वैचारिकदृष्ट्या प्रगत होते. त्यामुळे तिथे त्यांच्या अंगभूत गुणांस चालना मिळाली. १९३५ साली त्यांनी पहिली श्रेणी मिळवत गणितची प्रदवी प्राप्त केली. यादरम्यान त्यांच्या संवेदनशील तत्त्वचिंतक मनास गणिताची जोड मिळाली. त्यामुळे त्यांचे मन गणित आणि तत्त्वज्ञान याची सांगड घालू लागले.

पुढील काळात ॲलन ट्युरिंग यांनी ‘युनिव्हर्सल मशिन’ची संकल्पना मांडली. ‘गणितीय विधाने तर्कशास्त्राच्या आधारे मांडता येतील का?’ हा त्या संकल्पनेमागील प्रमुख प्रश्न होता. यातूनच ‘सैद्धांतिक संगणक विज्ञान’ या विषयाची पायाभरणी झाली असे मानले जाते. ‘आदर्श संगणक कसा असेल?’ हे ट्युरिंग यांनी आपल्या ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’च्या सहाय्याने दाखवून दिले. सोडवता येणारा कोणताही प्रश्न या काल्पनिक यंत्राच्या कार्यपद्धतीतून सोडवता आला असता.

युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन

युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन

तर्काच्या (Logic) आधारे सूचनावली (Instruction Set) तयार करायची. मग त्या सूचना ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’ला द्यायच्या. त्यानंतर आपली वैशिष्ट्यपूर्ण परंतु सोपी पद्धत वापरुन ते यंत्र आपणास उत्तर मिळवून देईल, अशी त्या यंत्रामागील सर्वसाधारण कल्पना होती. थोडक्यात ॲलन ट्युरिंग यांनी त्यावेळी एका प्रोग्रॅमेबल संगणकाची संकल्पना मांडली असे म्हणता येईल. कोणताही संगणक ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’हून अधिक सक्षम असू शकत नाही, असे मानले जाते. म्हणूनच ‘युनिव्हर्सल ट्युरिंग मशिन’कडे संगणक क्षेत्रात एक मानक म्हणून पाहिले जाते.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!