समोरच्या माणसाला ताडण्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळातील माणसांची समज वाढली आहे.

काही वेळापूर्वी मी युट्युबवर ट्रम्प आणि हिलरी यांच्यातील वादविवादाची एक फित पहात होतो. त्यात प्रेक्षकांमधील एकाला त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्याने त्यांना प्रश्न विचारला, जर तुम्हा दोघांना एकमेकांतील एखादा सकारात्मक गुण सांगायचा असेल तर तो तुम्ही काय सांगाल?

परीक्षकांनी उत्तर देण्याबाबत ट्रम्प यांच्याकडे इशारा केला, पण हिलरी यांनी स्वतःच बोलण्यास सुरुवात केली आणि त्यांनी म्हटले की, ‘ट्रम्प यांनी आपल्या मुलांना ज्या प्रकारे वाढवले त्याचे मला कौतुक वाटते’. या उत्तरात अपरिहार्यतेचा सूर होता. पण एव्हढे बोलून त्या थांबल्या नाहीत, तर निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे स्वतः बद्दल बोलत राहिल्या.

डॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन

डॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन – प्रश्नोत्तरातील एक क्षण

हिलरी यांचे बोलणे झाल्यानंतर ट्रम्प यांनी बोलण्यास सुरुवात केली. ‘हिलरी कितपत मनापासून बोलल्या ते मला माहित नाही, पण तरी मी ही गोष्ट चांगलेपणाने घेतो’, असे सांगत ते पुढे म्हणाले, ‘हिलरी मधली मला भावणारी गोष्ट म्हणजे त्या हार मानत नाहीत’. त्यांनी अशाप्रकारे अगदी छोटे, स्पष्ट आणि प्रांजळ उत्तर दिले.

या फिती खालील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जे लोक ट्रम्प यांचे विचार मानत नाहीत त्यांना देखील त्यांचे प्रांजळ उत्तर आवडले! कारण त्यांच्या लक्षात आले की, हिलरी यांच्या उत्तरामध्ये एक प्रकारची कृत्रिमता होती. थोडक्यात सांगायचे, तर आजकाल लोकांना कृत्रिमता आवडत नाही. त्यांना तुम्ही जसे आहात तसे पाहायला आवडते, आणि तुम्ही जर कृत्रिमता दाखवली, तर ती त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.

Advertisements
error: Content is protected !!