४९. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : दुसरे महायुद्ध

काही घटना इतक्या विदारक असतात की, त्या मानवी संस्कृतीच्या इतिहासात कायमच्या कोरल्या जातात. त्या घटनांचे पडसाद पुढे वर्षानुवर्षं कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जाणवत राहतात. ‘दुसरे महायुद्ध’ ही देखील मानवी इतिहासातील अशीच एक अनन्यसाधारण घटना आहे. दुसर्‍या महायुद्धाची पाळेमुळे खरं तर पहिल्या महायुद्धातच रोवली गेली होती. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा मानहानीकारक पराभव झाला. तेंव्हा व्हर्सायच्या तहांतर्गत जर्मनीवर काही जाचक अटी लादण्यात आल्या. त्यामुळे जर्मन स्वाभिमानास मोठी ठेच पोहचली. सोबतच जर्मनीची आर्थिक परिस्थिती देखील खालावली. अगदी याच काळात हिटलरचा उदय झाला. हिटलरने जर्मन अस्मिता जागृत करुन तिथल्या लोकांना उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवले. त्यामुळे जर्मन लोक हिटलरच्या मागे अगदी खंबीरपणे उभे राहिले.

पहिल्या महायुद्धात गमवावा लागलेला एकेक जर्मन प्रदेश हिटलरने पुन्हा परत मिळवण्यास सुरुवात केली, तेंव्हा इंग्लंड व फ्रांसने त्याचा तीव्र निषेध केला. परंतु त्यांनी हिटलरशी प्रत्यक्ष युद्ध करणे मात्र टाळले. कारण पहिल्या महायुद्धास केवळ २० वर्षे लोटली होती, आणि त्या धक्यातून युरोप अजून पुरता सावरला नव्हता. शिवाय मागील काही वर्षांपासून जागतिक महामंदी सुरु होती. अशाने पुन्हा एकदा महायुद्धाची दाहकता अनुभवण्यास दोस्त राष्ट्रे इच्छुक नव्हती. या गोष्टीचा हिटलरने पुरेपुर फायदा उठवला व काही ना काही कारण पुढे करुन शेजारील देशांवर युद्ध लादण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंग्लंड व फ्रांसला अखेर नाईलाजाने युद्धात उतरणे भाग पडले. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता तटस्थ राहण्याची भूमिका अमेरिकेने सुरुवातीला स्विकारली असली, तरी दोस्त राष्ट्रांना मात्र त्यांचे अप्रत्यक्ष सहकार्य होते.

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध

जर्मनीसोबतच जपान, इटली यांसारख्या राष्ट्रांनी पुढे विस्तारवादी भूमिका अवलंबली व शेजारील राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले. यास प्रतिकार म्हणून दोस्त राष्ट्रांची एक फळी उभी राहिली. अशाप्रकारे हळूहळू युद्धाचे क्षेत्र वाढत गेले व त्याचे पर्यवसान दुसर्‍या महायुद्धात झाले. हे महायुद्ध आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लढले गेले. त्यामुळे महायुद्धाच्या काळात झालेल्या जिवित व वित्त हानीस काही सुमार उरला नाही. ‘आधुनिक तंत्रज्ञान’ ही विजयाची गुरुकिल्ली होती. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राने आपापल्या शास्त्रज्ञांना युद्धोपयोगी प्रकल्पांवर नियुक्त केले. शिवाय संशोधनावर सढळहस्ते खर्च करण्यास सुरुवात केली. सरकारला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याचा तत्कालीन शास्त्रज्ञांवर मोठा दबाव होता. परंतु या दबावातूनच तंत्रज्ञानाच्या विकासास मोठी चालना मिळाली. संगणक, विमान, जहाज, रॉकेट, रडार, अणूउर्जा, औषधे, इत्यादी अनेक क्षेत्रात या काळात बरीच प्रगती झाली. आधुनिक युद्धाची भिषणता अनुभवल्याने पुढील काळात जगाने अधिक सामंजस्य दाखवले. महायुद्धानंतर युरोपीय वसाहतवादही टप्याट्प्याने संपुष्टात आला.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!