या विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा अंदाज तर्कसुसंगत असून येत्या दशकात येऊ घातलेल्या अत्याधुनिक दुरदर्शिका पाहता २०३० सालापर्यंत परग्रहवासीयांचा मागोवा लागण्याची दाट शक्यता आहे.

एखादी गोष्ट प्रत्यक्ष परिक्षणाने सिद्ध झाल्याशिवाय शास्त्रज्ञ त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. सूर्याभोवती जसे ग्रह आहेत, तसे इतर ताऱ्यांभोवती देखील ग्रह असू शकतात ही गोष्ट अगदी तर्काला धरून होती, पण प्रत्यक्ष केपलर दुरदर्शिकेने अशा बाह्यग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वेध घेण्यास सुरुवात करेपर्यंत शास्त्रज्ञांनी त्या तर्कास खऱ्या अर्थाने मान्यता दिली नाही. अर्थात एखादी गोष्ट सिद्ध होण्याकरिता तर्काला पुराव्याची जोड मिळणे अत्याश्यक असते!

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे अवकाशातील कल्पनाचित्र

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे कल्पनाचित्र

मला वाटतं बाह्यग्रहांबाबत जसे घडले, तसेच परग्रहवासीयांबाबतही घडेल. विश्वाच्या अनंत पसाऱ्यात पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र जीवसृष्टी असावी असे वाटणे अगदी तर्कसुसंगत आहे, पण त्यानुषंगाने अजून एकही ठोस पुरावा हाती आलेला नाही. असे असले तरी येत्या काळात ‘एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप’, ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ अशा काही अत्याधुनिक दुरदर्शिका पृथ्वीवरून, तसेच अवकाशातून अंतराळ निराक्षणासाठी रुजू होत आहेत. काही विशेष संकेतांना हेरून ते एखाद्या बाह्यग्रहावर जीवसृष्टी आहे किंवा नाही हे निश्चित करू शकतील.

अत्याधुनिक दुरदर्शीकांसोबतच सध्या सुरू असलेली मंगळ, तसेच चंद्रमोहिमांची एकंदरीत तयारी पाहता २०२५ पुढील कालखंड हा खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत रोमहर्षक कालखंड असेल हे निश्चित!

Advertisements
error: Content is protected !!