१९. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : डिफरन्स इंजिन

बॅबेज यांच्या काळात आकडेमोड ही माणसांमार्फत केली जायची. विशेष म्हणजे आकडेमोड करणार्‍या या माणसांना त्याकाळी ‘कंम्प्युटर’ म्हणत. उद्योग-व्यवसायाच्या वाढीसोबतच आकडेमोड ही अधिक किचकट व गुंतागुंतीची होऊ लागली. त्यामुळे गणित सोडवत असताना त्यातील मानवी चुका वाढू लागल्या.

अगदी केंब्रिज विद्यापिठात शिक्षण घेत असतानापासून बॅबेज या समस्येवर विचार करत होते. गणित सोडवण्याचे काम यंत्रामार्फत करुन घेतल्यास मानवी चुकांची समस्या उद्भवणार नाही, असे त्यांना मनोमन वाटत होते. १९व्या शतकात यांत्रिकीकरणाने वेग पकडला होता. तेंव्हा त्यांची ही कल्पना देखील त्या काळास अनुरुप अशीच होती. त्याकाळी वीजेच्या क्षेत्रातील शोधकार्य हे अगदीच प्राथमिक टप्यात सुरु होते. त्यामुळे बॅबेज यांचे यंत्र पूर्णतः ‘मेकॅनिकल’ स्वरुपाचे असणार होते. अर्थात त्या यंत्रास वीजेची आवश्यकता नव्हती. बॅबेज यांचे ‘डिफरन्स इंजिन’ चालवण्याकरिता मानवी शक्तिचा वापर होणार होता.

चार्ल्स बॅबेज यांचे डिफरन्स इंजिन

चार्ल्स बॅबेज यांचे डिफरन्स इंजिन

१८२० साली ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’च्या स्थापनेत बॅबेज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खगोलिय गणितांत प्रमाण निर्माण करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यादिशेने कार्य करत असताना चार्ल्स बॅबेज यांनी १८२२ साली ‘डिफरन्स इंजिन’ची कल्पना मांडली. डिफरन्स इंजिनच्या माध्यमातून एखादे उत्तर छापिल स्वरुपात प्राप्त होऊ शकणार होते. कारण यात प्रिंटरचा समावेश होता. या यंत्रामुळे गणितातील मानवी चुका दूर झाल्या असत्या. बॅबेज यांनी स्वखर्चातून या यंत्राचा काही भाग पूर्ण केला. पण हा एक खूप मोठा प्रकल्प होता. त्यामुळे पुढील कामासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडून आर्थिक मदत मिळवली. पैशांची तजवीज होताच त्यांनी याकामी एका कुशल व्यक्तीस नियुक्त केले. बॅबेज यांच्या घरातील एका खोलीत डिफरन्स इंजिनचे काम सुरु झाले. पण लवकरच त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले.

चार्ल्स बॅबेज यांच्या काळात अवजार घडवणारी साधणे आणि हाताखाली काम करणारे लोक फारसे कुशल नव्हते. त्यामुळे त्यांनी या अडचणीवर मात करण्याकरिता उत्पादन क्षेत्राचा आभ्यास केला. त्यानंतर ‘डिफरन्स इंजिन’चे भाग निर्माण करण्यास आवश्यक अशी साधने स्वतः घडवली. याचा अनायसे इंग्लंडमधील उत्पादन क्षेत्रास मोठा लाभ झाला. पण ‘डिफरन्स इंजिन’मागील शुक्लकाष्ट काही संपले नाही. दरम्यानच्या काळात याकामी नियुक्त केलेल्या व्यक्तीसोबत बॅबेज यांचे खटके उडत होते. १८२९ साल उजाडेपर्यंत सरकारने पुरवलेली मदत आणि बॅबेज यांनी स्वतः केलेली पदरमोड संपत आली असली, तरी त्यांचे ‘डिफरन्स इंजिन’ मात्र अर्धवटच होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वबाजूंनी टीका होऊ लागली. अखेर १८३२ सालापर्यंत ‘डिफरन्स इंजिन’चा काही भाग पूर्ण झाला व या यंत्राने सरतेशेवटी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली.

परंतु मागील १० वर्षांत डिफरन्स इंजिनचा केवळ काही भागच पूर्ण झाला होता. हे यंत्र पूर्ण करायचे झाल्यास अजून बराच खर्च येणार होता. शिवाय चार्ल्स बॅबेज यांना दरम्यानच्या काळात ‘डिफरन्स इंजिन’हून सुधारित व चांगल्या अशा ‘ॲनॅलिटिकल इंजिन’ची कल्पना सुचली होती. या सार्‍या गोष्टींचा विचार केला असता ब्रिटिश सरकारने या प्रकल्पातून आपला हात आखडता घेतला. अशाप्रकारे चार्ल्स बॅबेज यांचा हा प्रकल्प अंततः मागे पडला.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!