२१. संगणकाची गोष्ट : अचूक आकडेमोड : ॲनॅलिटिकल इंजिन : भाग २

१८०१ साली जोसेफ जॅकयार्ड यांनी पंच कार्ड्स तयार करण्याकरिता एक यंत्र विकसित केले होते. जॅकयार्ड यांच्या पंच कार्ड्सचा वापर हा त्याकाळी विणकामात होत होता. बॅबेज यांना त्यातूनच संगणकासाठी पंच कार्ड्स वापरण्याची कल्पना सुचली असावी. आज या कामासाठी कीबोर्डसारख्या साधनांचा वापर केला जातो.

पंच कार्ड

पंच कार्ड

ॲनॅलिटिकल इंजिनमध्ये आवाजाकरिता एक ‘घंटा’ समाविष्ट करण्यात येणार होती. जेणेकरुन काही अडचण आल्यास त्यासंदर्भातील सूचना मिळू शकली असती. बॅबेज यांच्या डिफरन्स इंजिनप्रमाणेच ॲनॅलिटिकल इंजिनमध्ये देखील प्रिंटरची योजना होती. पण दूर्देवाने चार्ल्स बॅबेज यांच्या हयातीत ॲनॅलिटिकल इंजिनचा केवळ काही भागच पूर्ण होऊ शकला.

कोणत्याही प्रकारचे गणित सोडवण्यासाठी ॲनॅलिटिकल इंजिनचा उपयोग करता येईल, असे बॅबेज यांना वाटत होते. पण त्या यंत्राचे गणितापलिकडील महत्त्व एडा लव्हलेस यांच्या लक्षात आले होते. ॲनॅलिटिकल इंजिनचा उपयोग हा केवळ गणित सोडवण्यासाठी नव्हे, तर संगीत ऐकण्यासाठी देखील करता येईल, अशी त्यांची भविष्यवेधी दृष्टी होती. ॲनॅलिटिकल इंजिनसाठी त्यांनी एक अज्ञावली (Program) देखील लिहिली होती. त्याधारे अनेक लोक त्यांना जागातील पहिली अज्ञावलीकार (Programmer) मानतात. भविष्यात अंकांसोबतच चिन्हांवरही काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले होते. एडा लव्हलेस यांनी ॲनॅलिटिकल इंजिनवर एक पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. २८ नोव्हेंबर १८५२ रोजी एडा लव्हलेस यांचे वयाच्या केवळ ३६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या ईच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांची शवपेटी त्यांच्या वडिलांच्या शेवपेटीशेजारी दफन करण्यात आली.

ॲनॅलिटिकल इंजिन

ॲनॅलिटिकल इंजिन

चार्ल्स बॅबेज त्यांच्या अंतिम वर्षांत वैतागलेल्या मनःस्थितीत असत. त्यातच रस्त्यावर संगीत वाजवणारे लोक बॅबेज यांच्याप्रती असलेला राग मनात धरुन त्यांच्या घरासमोर मुद्दामहून संगीत वाजवत. १८ ऑक्टोबर १८७१ रोजी चार्ल्स बॅबेज यांचे वयाच्या ७९व्या वर्षी लंडन येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मेंदूचे दोन भाग दोन वेगवेगळ्या संग्रहालयात जतन करुन ठेवण्यात आलेले आहेत.

बॅबेज यांनी तत्कालीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संगणक तयार करण्याचा मोठा खटाटोप केला. पण त्यावेळच्या परिस्थितीत ते त्यांच्या कल्पनांना मूर्तरुप देऊ शकले नाहीत. चार्ल्स बॅबेज हे काळाच्या पुढील व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे ‘ॲनॅलिटिकल इंजिन’ सारखा ‘प्रोग्रॅमेबल संगणक’ पाहण्याकरिता या जगास पुढील शंभर वर्षं वाट बघावी लागली.

दरम्यान मध्ययुगीन महाराष्ट्र कात टाकू लागला होता. पाश्चत्य ज्ञानाने महाराष्ट्रातील नवी पिढी प्रभावित झाली होती. यातुनच पुढे सामाजिक सुधारणा सुरु झाल्या. माहात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, असे महान समाजसुधारक तत्कालीन महाराष्ट्रातील लोकजीवन घडवत होते.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!