३१. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : बोरोज ॲडिंग मशिन

डॉर फेल्ट १८८०च्या दशकात जेंव्हा ‘कॉम्पटॉमिटर’ या आपल्या ‘ॲडिंग मशिन’वर काम करत होते, तेंव्हा त्याच सुमारास विल्यम बोरोज हे देखील स्वतःची ‘ॲडिंग मशिन’ तयार करत होते. विल्यम बोरोज यांचे वडील एक मेकॅनिक होते. त्यामुळे लहानपणापासूनच बोरोज यांना त्या क्षेत्रात गती होती. तरुणपणी त्यांनी बँकेत क्लर्क म्हणून काही काळ काम केले. परंतु बोरोज यांना ते काम फारच जड गेले. कामातील ताणतणावाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. तेंव्हा त्यांनी बँकेतील नोकरी सोडली व आपल्या वडिलांप्रमाणे मेकॅनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. बँकेतील एकंदरीत अनुभव लक्षात घेता त्यांनी बँकेसाठी अँडिंग मशिन तयार करण्याचे मनावर घेतले. त्यासाठी काही सहकार्‍यांच्या मदतीने १८८६ साली त्यांनी ‘अमेरिकन अरिदमॉमिटर कंपनी’ स्थापन केली. पुढे १९०५ साली या कंपनीचे नाव बदलून ‘बोरोज ॲडिंग मशिन कंपनी’ असे करण्यात आले.

बोरोज ॲडिंग मशिन

बोरोज ॲडिंग मशिन

आपल्या कामात अचूकता असावी असा बोरोज यांचा आग्रह होता. त्यामुळे यंत्र तयार करत असताना त्याबाबत ते अगदी काटेकोर असत. बोरोज यांच्या ॲडिंग मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रिंटरची सोय होती. त्यामुळे या मशिनमार्फत करण्यात आलेली गोळाबेरीज ही छापिल स्वरुपात उपलब्ध होत असे. त्याकाळी ही एक अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट होती. तरी देखील पहिल्या दशकात या यंत्राला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळूहळू या यंत्राची गुणवत्ता व्यवसायिकांच्या लक्षात येऊ लागली. त्यामुळे बोरोज यांचा व्यवसाय वृद्धिंगत होऊ लागला. परंतु त्याच सुमारास म्हणजे १८९८ साली वयाच्या ४३व्या वर्षी विल्यम बोरोज यांचे निधन झाले.

२०व्या शतकाच्या सुरुवातीला ‘बोरोज ॲडिंग मशिन कंपनी’चा व्यवसाय हा खर्‍या अर्थाने वाढीस लागला. परंतु त्या यंत्रावर काम करण्याकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती. तेंव्हा त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्याकरिता अनेक शाळा निर्माण झाल्या. १९०८ साली बोरोज कंपनीने ५८ प्रकारच्या ॲडिंग मशिन्स तयार केल्याचे समजते. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय नजरेसमोर ठेवून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे बाजारात आणली. दरम्यान ॲडिंग मशिन्सची निर्मिती करणार्‍या इतर काही लहान कंपन्या बोरोजने विकत घेतल्या. पहिले महायुद्ध सुरु होण्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजेच १९१३ साली अमेरिकेत प्राप्तीकराची फेररचना करण्यात आली. त्यामुळे त्यासंदर्भातील कामकाजात वाढ झाली. परिणामी ‘बोरोज ॲडिंग मशिन’च्या मागणीत भर पडली. साधारणतः पहिल्या महायुद्धापासून दुसर्‍या महायुद्धापर्यंत बोरोजच्या ॲडिंग मशिन्सना चांगली मागणी होती. दुसर्‍या महायुद्धानंतर मात्र संगणक युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!