मराठी इंटरनेट : माझा सध्याचा युट्युब सेटअप

आज मी माझ्या सध्याच्या युट्युब सेटअप बद्दल बोलणार आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं, तर सर्वप्रथम प्रश्न पडतो तो म्हणजे नेमकी सुरुवात कुठून करायची? सारे काही यथायोग्य असायला हवे अशी अपेक्षा बाळगून जर आपण सुरुवात करायची म्हटले, तर सुरुवात करणे कठीण होऊन जाते, आणि त्यामुळे अनेकदा आपण मुळात सुरुवातच करू शकत नाही. आपल्या कामामध्ये परिपूर्णता तर असायलाच हवी, पण परिपूर्णता हा एक प्रवास आहे, आणि त्यासाठी कुठून तरी अपरिपूर्ण सुरुवात करावी लागते. माझी ही युट्युब वरील सुरुवात देखील अशीच अपरिपूर्ण आहे आणि सध्या तरी युट्यूब फित चित्रित करण्यासाठी मी माझ्या स्मार्टफोन समोरील कॅमेरॅचा वापर करत आहे.

कॅमेरा

सॅमसंग गॅलक्सी ऑन ६

सॅमसंग गॅलक्सी ऑन ६

फित चित्रित करण्यासाठी मी स्मार्टफोन का वापरतो? फित चित्रित करण्यासाठी स्मार्टफोन वापरण्याचे खरे कारण हे बजेट नाहीये, कारण काही काळापूर्वी मी यूट्यूबसाठी एक चांगला कॅमेरा विकत घेतला होता. चित्रणासाठी स्मार्टफोन वापरण्याचे खरे कारण आहे, ते म्हणजे स्मार्टफोनवरून चित्रण, संपादन, आणि प्रकाशन करणे हे कॅमेरा आणि लॅपटॉप वापरण्यापेक्षा कमालीचे सोपे आहे आणि त्यामुळे वेळेची मोठी बचत होते.

माझा युट्युब सेटअप

तंत्रज्ञान वेगाने बदलत राहते. त्यामुळे दरवर्षी मी एक नवा स्मार्टफोन घेतो. पण स्मार्टफोन घेताना मी कधीही महागडा स्मार्टफोन घेत नाही, तर नेहमी एक मधल्या श्रेणीतील स्मार्टफोन घेतो. त्यामुळे सध्या चित्रणासाठी मी जो स्मार्टफोन वापरतोय तो सॅमसंगचा एक मधल्या श्रेणीतील स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचे नाव आहे ‘सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६’. गेल्यावर्षी मी हा स्मार्टफोन सुमारे १३ हजार रुपयांना विकत घेतला होता, पण काही दिवसांपूर्वी सवलतीच्या काळात फ्लिपकार्टवर तो केवळ ९ ते १० हजार रुपयांना उपलब्ध होता. तेंव्हा पुढच्या वेळी मी जेंव्हा नवा स्मार्टफोन विकत घेईन, तेंव्हा आपल्याला माझ्या युट्युब फितीची गुणवत्ता अधिक चांगली झालेली दिसून येईल.

मायक्रोफोन

मायक्रोफोन

मायक्रोफोन

युट्युब हे एक दृकश्राव्य माध्यम आहे आणि इथे चित्रासोबतच आवाज देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनमध्ये आजकाल बऱ्यापैकी चांगले कॅमेरे येऊ लागलेले आहेत, त्यामुळे चित्रफितीच्या गुणवत्तेचा तसा फारसा काही प्रश्न येत नाही, खरा प्रश्न येतो तो ‘आवाजाचा’! नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी मी एक मायक्रोफोन विकत घेतला होता. लेखाखाली दिलेल्या फितीमध्ये आपण जो आवाज ऐकाल तो याच मायक्रोफोन मधून मुद्रित केलेला आहे. हा मायक्रोफोन मी साधारण २५० रुपयांना ऑनलाईन विकत घेतला होता. हा मायक्रोफोन वापरत असताना एक विशेष काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे स्मार्टफोनवर चित्रिण करत असताना आपल्याला जर हा मायक्रोफोन वापरायचा असेल, तर अशावेळी आपल्या स्मार्टफोन मधील ‘फ्लाईट मोड’ किंवा ‘एरोप्लेन मोड’ सुरू करावा लागतो. अशाने मोबाईल सिग्नलच्या इंटरफेरन्सचा आवाज आपल्या फितीमध्ये मुद्रित होत नाही.

ट्रायपॉड

ट्रायपॉड

ट्रायपॉड

आपण जर माझ्या अगदी सुरुवातीच्या युट्यूब फिती पाहिल्या, तर आपणाला त्यातील फ्रेम अधूनमधून सतत हलताना दिसेल. त्यामुळे फित चित्रित करत असताना स्मार्टफोन स्थिर राहावा म्हणून मी नंतर एक ट्रायपॉड विकत घेतला. या ट्रायपॉडमुळे मला फित चित्रित करत असताना माझा स्मार्टफोन एका कोनामध्ये स्थिर ठेवणे सोपे जाते. आपणालाही जर असा ट्रायपॉड हवा असेल, तर तो केवळ ४०० ते ५०० रुपयांत ऑनलाइन खरेदीच्या संकेतस्थळावर मिळून जाईल.

तर हा आहे माझा सध्याचा अगदी साधा-सोपा युट्युब सेटअप. सध्यातरी या सेटअमध्ये काही बदल करण्याचा माझा विचार नाहीये, पण भविष्यात जर मी यात काही बदल केला, तर मी तो आपणाला सांगेनच!

‘मराठी इंटरनेट’ युट्युब वाहिनीचा धागा – https://vichar.link/mitv

Advertisements
error: Content is protected !!