१५. संगणकाची गोष्ट : व्यवहार व कालमापन : अँटिकिथरो मेकॅनिझम : रिनेसॉन्स आणि ह्युमनिस्ट

पुरातन काळी ग्रीस तसेच रोमने बहुआयामी क्षेत्रांत मोठी उंची गाठलेली दिसते. परंतु अंधार्‍या युगात त्यांच्या दैदिप्यमान प्रगतीची वाढ जणू खुंटली होती. पुढे इटलीला जेंव्हा आर्थिक व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले, तेंव्हा तेथील लोकांस दैनंदिन रगाड्यातून थोडीशी सवड मिळाली. अशावेळी आपल्या महान पूर्वजांनी मागे सोडलेला वारसा निरखून पाहण्यात ते हरखून गेले. माणसाकडे जेंव्हा पुरेसा पैसा येतो, तेंव्हा तो चौकस वृत्तीने जीवनाचा अर्थ लावू पाहतो. कदाचित जीवनाप्रती असलेल्या याच कुतूहलातून इटलीमधील श्रीमंत व्यापार्‍यांनी पुढील काळात कला आणि कलावंत यांना आश्रय दिला.

याच कालखंडात ‘ह्युमनिझम’ विचारसरणी मूळ धरु लागली. मानवास मध्ययुगातून आधुनिक युगाकडे घेऊन जाणारे एक भव्य प्रवेशद्वार म्हणून या विचारसरणीकडे पाहता येईल. अशाने जीवनाकडे उदार, वैचारिक, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची नवी दृष्टी मानवास प्राप्त झाली.

१५व्या व १६व्या शतकात ‘रिनेसॉन्स’ आपल्या शिखरावर पोहचले. अशावेळी इटलीमधील फ्लोरेन्स शहर परिवर्तनाचे केंद्रबिंदू ठरले. त्या काळात निर्माण झालेल्या अप्रतिम कलाकृतींकडे दैवी प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून पाहता येईल. लिओनार्डो द विंसी हे त्या काळातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. विज्ञान व कला अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांचा वावर होता. त्यांनी चितारलेले ‘दी मोना लिसा’ हे चित्र जगप्रसिद्ध आहे. लिओनार्डो द विंसी यांच्या कार्यकाळातच मायकलअँजेलो हे देखील एक थोर कलावंत म्हणून नावारुपास आले. ते केवळ एक महान चित्रकारच नव्हते, तर श्रेष्ठ मूर्तीकार देखील होते! मायकलअँजेलो यांनी कलेच्या क्षेत्रात आपला कायमस्वरुपी ठसा उमटवला. त्यांस समकालिन अशा राफेल यांनी देखील त्यावेळी चित्रकलेच्या माध्यमातून आपली देवदत्त प्रतिभा सिद्ध केली. रिनेसॉन्स कालखंडात मानव कलेच्या क्षेत्रात नवी उंची गाठू लागला होता, परंतु त्याचवेळी त्याने उर्वरीत क्षेत्रांतही क्षितिजाची परिक्षा घेण्यास सुरुवात केली होती.

निकोलस कोपर्निकस

कोपर्निकस

कोपर्निकस हे त्याच काळातील व त्याच परिसरातील एक गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते ‘ह्युमनिस्ट’ या सुधारणावादी चळवळीचे समर्थक होते. त्यांनी आपली दूरदर्शिका वापरुन अवकाशाचे निरिक्षण केले. त्याधारे त्यांनी सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे आपले निरिक्षण नोंदवले. पुढे गॅलेलिओ यांनी अवकाश निरिक्षणासाठी अधिक चांगली दूरदर्शिका घडवली. विद्यापिठांतून गणित शिकवत असतानाच त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सिद्धांत मांडले. केपलर व गॅलेलिओ हे दोघे समकालीन खगोलशास्त्रज्ञ होते. केपलर यांनी खगोलशास्त्र, गणित, तसेच भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे काम केले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!