२८. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : रेमिंग्टन टाईपरायटर : टायपिंग

टाईपरायटरला देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता भासत असे. म्हणूनच रेमिंगटनने जगभरातील सर्व प्रमुख शहरांत आपल्या शाखा उघडल्या. त्यानंतर या शाखांमार्फत आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली. टाईपरायटरमध्ये जर काही बिघाड झाला, तर रेमिंगटनच्या दुकानातून तो दुरुस्त करता येत होता. अशाप्रकारे शिवणकामाच्या यंत्रासोबत टाईपरायटरला देखील ‘विक्रीपश्च्यात सेवा’ मिळू लागली.

हळूहळू टाईपरायटरची उपयुक्तता दैनंदिन कामकाजात सिद्ध होऊ लागली. त्यामुळे अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. १९ व्या शतकाच्या अखेरीस टाईपरायटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. परिणास्वरुप दरवर्षी हजारो टाईपरायटर्सची विक्री होऊ लागली. त्यांवर काम करण्याकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती. तेंव्हा टायपिंग शिकवणार्‍या खास प्रशिक्षण संस्था उदयास आल्या. टायपिंगच्या कामासाठी पुरुषांची संख्या कमी पडू लागली, म्हणून महिलांना हे काम करण्याची संधी मिळाली. अशाप्रकारे कार्यालयीन कामकाजात महिलांचा प्रवेश झाला. महिला स्वतः कमवू लागल्या, तसा त्यांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागला.

पहिली महिला टाईपरायटर

पहिली महिला टाईपरायटर

१९व्या शतकाच्या अखेरीस कार्यालयीन कामकाज वाढले, तसे कार्यालयीन कामकाजाची कागदपत्रे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे या कागदपत्रांचे व्यवस्थित वर्गीकरण करणे हे एक आव्हानात्मक काम ठरु लागले. ही समस्या लक्षात घेता, महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवता यावीत आणि गरज पडताच ती चटकन सापडावीत यादृष्टीने विचार घडू लागला. यातूनच प्रेरणा घेऊन १८९८ साली जेम्स रँड सिनिअर यांनी ‘रँड लेजर कंपनी’ स्थापन केली. त्यांच्या व्यवसायास मोठे यश प्राप्त झाले व पुढे त्यांच्या मुलाने त्याच क्षेत्रात उच्चांक गाठला. दरम्यान वडिलांशी बेबनाव झाल्याने रँड ज्युनिअर यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय स्थापन केला. त्यांनी आपल्या कंपनीस ‘कार्डेक्स कंपनी’ असे नाव दिले. पुढे दशकभरानंतर आईच्या मध्यस्थीने रँड पिता-पुत्र पुन्हा एकत्र आले. तेंव्हा त्यांची कंपनी ‘रँड कार्डेक्स कंपनी’ या नावाने कार्य करु लागली. त्यानंतर १९२७ साली ‘रेमिंगटन टाईपरायटर कंपनी’चे रँड ज्युनिअर यांच्या कंपनीत विलिनिकरण झाले. अशाप्रकारे नव्याने निर्माण झालेली ही कंपनी ‘रेमिंगटन रँड’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!