२७. संगणकाची गोष्ट : कार्यालयीन गरज : रेमिंग्टन टाईपरायटर : शिफ्ट की

आपले यंत्र विकसित करण्यासाठी शोल्स यांनी प्रथम डेन्समोर यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवले. पण अर्थिक निकड वाढल्यानंतर त्यांना याकामी एका मोठ्या व्यवसायिकाची गरज जाणवली. त्यांनी फिलो रेमिंगटन यांना याबाबत विचारले. अमेरिकेतील गृहयुद्ध त्यावेळी नुकतेच संपले होते. त्यामुळे शस्त्रास्त्रांचे व्यवसाय करणारे रेमिंगटन हे देखील नव्या उत्पादनाच्या शोधात होते. रेमिंगटन यांनी १००० टाईपरायटर्स उत्पादित करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे १८७४ साली ‘शोल्स अँड ग्लिडन टाईपरायटर’ विक्रीसाठी उपलब्ध झाले. त्यांच्या पहिल्या काही ग्राहकांमध्ये तत्कालीन जगप्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन हे देखील होते.

शोल्स अँड ग्लिडन टाईपरायटर

शोल्स अँड ग्लिडन टाईपरायटर

१८७४ ते १८७८ दरम्यान सुमारे ५००० ‘शोल्स अँड ग्लिडन टाईपरायटर’ उत्पादित करण्यात आले. या टाईपरायटरला नक्षीदार सजावट करण्यात आली होती. टाईपरायटारचे उत्पादन करण्यापूर्वी रेमिंगटन शिवणकामाचे यंत्र तयार करुन विकत होते. तेंव्हा ‘शोल्स अँड ग्लिडन टाईपरायटर’ ठेवण्याकरिता आपसुकच शिवणकामाचा मेज वापरला गेला. १८७८ साली या टाईपरायटरची दुसरी सुधारित आवृत्ती बाजारात आली. पहिल्या टाईपराईटरमध्ये केवळ मोठी इंग्लिश अक्षरे टाईप करण्याची सोय होती. नवीन आवृत्तीच्या सहाय्याने मात्र मोठी आणि छोटी अशी दोन्ही प्रकारची इंग्लिश अक्षरे टाईप करता येऊ लागली. त्यासाठी ‘शिफ्ट की’चा सर्वप्रथम वापर करण्यात आला. बाजारात आलेल्या या नवीन टाईपरायटरचे नाव ‘रेमिंगटन स्टँडर्ड २’ असे होते. त्यानंतर रेमिंगटन टाईपरायटरच्या अनेक सुधारित आवृत्त्या बाजारात आल्या. त्यापैकी ‘रेमिंगटन ६’ ही १८९४ साली बाजारात आलेली आवृत्ती सर्वाधिक लोकप्रिय ठरली.

रेमिंगटन स्टँडर्ड २ टाईपरायटर

रेमिंगटन स्टँडर्ड २ टाईपरायटर

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!