७५. संगणकाची गोष्ट : उद्योग-व्यवसाय : एडसॅक : भाग ४

अशाप्रकारे १९४९ सालच्या मे महिन्यात ‘इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कॅलक्युलेटर’ म्हणजे ‘एडसॅक’ हा संगणक कार्यरत झाला. विल्क्स यांनी संगणक निर्मितीबाबत व्यवहारी भूमिका स्विकारली होती. त्यामुळे त्यांनी जो संगणक निर्माण केला तो इतरांच्या तुलनेत आकाराने लहान होता आणि त्याची गती देखील कमी होती. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, इत्यादी अनेक क्षेत्रांत एडसॅकचा उपयोग झाला. याशिवाय जीवशास्त्राशी संबंधीत गणितीय समस्या सोडवण्यासाठी देखील या संगणकाचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे जीवशास्त्राच्या क्षेत्रात प्रथमच एखाद्या संगणकाचा उपयोग झाला. १९५८ साली ‘एडसॅक १’ हा संगणक सेवानिवृत्त झाला. त्यानंतर ‘एडसॅक २’ या संगणकाने त्याची जागा घेतली. ‘एडसॅक २’ हा संगणक पुढे १९६५ सालापर्यंत कार्यरत होता.

लिओ - पहिला व्यवसायिक संगणक

लिओ – पहिला व्यवसायिक संगणक

एडसॅक संगणकाचे यश पाहून लायन्स कंपनीने स्वतःचा संगणक निर्माण करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. त्यांनी आपल्या संगणकास ‘लायन्स इलेक्ट्रॉनिक ऑफिस’ म्हणजेच ‘लिओ’ असे नाव दिले. १९५४ साली हा संगणक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला. तत्कालीन एका जाहिरातीत त्यांनी संगणकाचे समकालीन व्यवसायातील महत्त्व पटवून दिले आहे. त्यात ते म्हणतात –

‘कामाकरिता कारकून मिळवणे ही एक अवघड गोष्ट आहे. शिवाय तो कारकून विश्वासू असायला हवा. परंतु वाढत्या उलाढालीसोबत कारकुनांची गरजही वाढणार आहे. आधुनिक काळाची गरज भागवण्यासाठी आला आहे – ‘लिओ’ (LEO) – जगातील पहिले स्वयंचलित कार्यालय! इलेक्ट्रॉनिक संगणक जरी नवीन नसले, तरी कार्यालयासाठी बनवण्यात आलेला ‘लिओ’ हा जगातील पहिलाच संगणक आहे. तो नेहमीची सर्वसाधरण कामे कारकुनापेक्षा अधिक गतीने व अचूकतेने पूर्ण करु शकतो. अशाने मानवी कारकूनांना अधिक दर्जात्मक व फलदायी कामे करता येतील!’.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!