४७. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ॲटॅनॅसऑफ-बेरी कंम्प्युटर : ॲटॅनॅसऑफ आणि मॉकली यांची भेट

पुढे डिसेंबर १९४० मध्ये भरलेल्या एका विज्ञान परिषदेत ॲटॅनॅसऑफ यांची जॉन मॉकली नावाच्या एका संशोधकाशी ओळख झाली. ‘ॲनॅलॉग कॅलक्युलेटर’च्या सहाय्याने हवामानाचा अंदाज कसा वर्तवावा?’ यासंदर्भातील व्याख्यान देण्याकरिता मॉकली त्या परिषदेत सहभागी झाले होते. व्याख्यानानंतर ॲटॅनॅसऑफ यांनी मोठ्या उत्साहाने मॉकली यांची भेट घेतली. आपण एका इलेक्ट्रॉनिक संगणकावर काम करत असल्याचे त्यांनी मॉकली यांना सांगितले. शिवाय अशाप्रकारचा संगणक तयार करणे फारसे खर्चिक नसल्याचेही विषद केले. अशाने मॉकली यांच्या मनात त्याबाबत कुतूहल निर्माण झाले. जेंव्हा ॲटॅनॅसऑफ यांनी मॉकली यांना आपल्या घरी बोलावले, तेंव्हा ते अगदी आनंदाने तयार झाले. तरी मॉकली यांच्यामागे त्यावेळी कामाचा व्याप असल्याने ॲटनॅसऑफ यांच्या घरी जाण्यास त्यांस थोडा अवधी लागला.

जॉन मॉकली

जॉन मॉकली

अखेर १९४१ सालच्या जून महिन्यात मॉकली यांनी ॲटॅनॅसऑफ यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. त्या दोघांनाही संगणक क्षेत्रात समान रस होता. त्यामुळे त्यांचे सूर जुळण्यास वेळ लागला नाही. त्या भेटीदरम्यान त्यांनी इलेक्ट्रॉनिक संगणकाच्या अनुषंगाने येणार्‍या तांत्रिक बाबींवर पुष्कळ चर्चा केली. ॲटॅनॅसऑफ यांनी मॉकली यांना एबीसी संगणकाशी निगडीत ३५ पानी हस्तलिखित वाचायला दिले. मॉकली यांची ती भेट पाच दिवसांची होती. सप्ताहाच्या अखेरीस त्यांनी ॲटॅनॅसऑफ यांच्या संगणक प्रयोगशाळेसही भेट दिली. ॲटॅनॅसऑफ यांच्या कार्याचे खरे महत्त्व जॉन मॉकली यांच्या लक्षात आले, तेंव्हा ते उत्साहाने व आनंदाने प्रफुल्लित झाले! मॉकली यांच्या दृष्टीने तो जणू जगातील सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प होता! ‘संगणकाच्या भवितव्याची दिशा कशी असेल?’ याची जॉन मॉकली यांना या भेटीदरम्यान सर्वसाधारणपणे कल्पना आली.

संगणकाकडून एखादे कार्य करुन घ्यायचे असेल, तर त्यास ते कार्य समजायला हवे. त्यासाठी संगणकाशी संगणकाच्या भाषेत संवाद साधायला हवा. पण संगणकाशी बोलायचे, तर संगणकाची भाषा कोणती? कोणत्या भाषेत बोलल्यास संगणकास आपले म्हणने समजेल? ॲटॅनॅसऑफ यांना बायनरी पद्धतीत या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यांनी प्रथम बायनरी भाषा समजू शकेल असा संगणक तयार केला. त्यानंतर त्याच्याशी बायनरी भाषेत संवाद साधला. बायनरी पद्धतीत केवळ १ आणि ० या दोन अंकांचा वापर केला जातो. आज या संकल्पनेवर अवघे संगणकविश्व उभे आहे!

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!