५३. संगणकाची गोष्ट : संशोधन व संरक्षण : ट्युरिंग मशिन

ॲलन ट्युरिंग हे एक गणितज्ञ होते. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनकही मानले जाते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याचे गुप्त संदेश वाचता यावेत यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ‘कोणतीही समस्या सोडवायची झाल्यास एखादे आदर्श यंत्र कसे काम करेल?’ याचे त्यांनी सैद्धांतिक विश्लेषण केले. त्यांच्या या काल्पनिक यंत्रास ‘ट्युरिंग मशिन’ असे म्हणतात. त्यांच्या या योगदानामुळे सैद्धांतिक संगणक विज्ञानात त्यांना मोलाचे स्थान दिले जाते.

२३ जून १९१२ रोजी ॲलन ट्युरिंग यांचा इंग्लंडमधील लंडन शहरात जन्म झाला. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या ओडिसामध्ये त्यावेळी त्यांचे वडील मोठे अधिकारी होते. ॲलन यांचे एक आजोबा बेंगाल आर्मीमध्ये कामाला होते, तर दुसरे आजोबा मद्रास रेल्वेत प्रमुख अभियंता होते. अशाप्रकारे त्यांचा परिवार भारतीय उपखंडात असला, तरी ॲलन यांचे शिक्षण मात्र इंग्लंडमध्येच पार पडावे अशी त्यांच्या आई-वडिलांची ईच्छा होती. त्यामुळे ॲलन यांची राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था इंग्लंडमध्ये लावण्यात आली. भारतीय उपखंडात असलेले त्यांचे आई-वडिल सुट्टीच्या काळात इंग्लंडला जात असत.

ॲलन यांना लहानपनापासूनच विज्ञानात मोठा रस होता. परंतु त्यादृष्टीने त्यांना पोषक वातावरण लाभले नाही. त्यांच्या मुक्त मनास शाळेची चौकट बंधनकारक ठरत होती. पुढे त्यांना अगदी जीवाभावाचा एक मित्र भेटला. तो बौद्धिकदॄष्टा ॲलन यांच्या तोलामोलाचा होता. त्यामुळे त्याच्याशी बोलताना ॲलन यांना मनमोकळेपणा जाणवत असे. पण दूर्देवाने पुढे दोन वर्षांनी त्या मित्राचे निधन झाले. याचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. यातूनच जीवन, अस्तित्त्व आणि प्रत्यक्ष मन याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

मागील भाग | पुढील भाग

Advertisements
error: Content is protected !!