कष्टांमागे निसर्गवारे असावे!

यशाच्या व्याख्येत कष्टाला अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे असे मला वाटते. कारण कष्ट करायचे म्हणून केल्याने यश लाभत नाही. कष्ट फलद्रूप व्हायचे असेल, तर त्यामागे काही प्रेरणा, विचार, व्यवहार असावा लागतो. कष्टामागे दिशा असेल, त्या दिशेने अनायसे निसर्गवारे वहात असेल, तरच कष्टातून माणसाची स्वप्ने साकार होतात. निसर्गवाऱ्यात आपसुक विहंगणारी माणसे नकळतच कष्टाचे महत्त्व अधोरेखित करतात, पण प्रत्यक्षात आपल्या कार्यामागे कसलासा वरदहस्त आहे हे अनेकांना आपल्या अंतरंगातून ठाऊक असते.

निसर्गवाऱ्याची दिशा हेरावी

जहाज, वाऱ्याची दिशा
कष्टाच्या प्रवासाला निसर्गवाऱ्याची दिशा असावी

निसर्गवाऱ्याच्या दिशेने आनायसे प्रवास घडतो, त्याला आपण नशीब म्हणतो. पण हे नशीब जर टिकवायचे असेल, तर त्यासाठी निसर्गवारे ओळखता यायला हवे. चाणाक्ष माणसे प्रथम निसर्गवाऱ्याची दिशा हेरतात, आणि मग त्या दिशेने कष्ट वेचतात. प्राचीनकाळी इटलीतील रोमन आणि महाराष्ट्रातील सातवाहन यांच्यामध्ये वाऱ्याच्या कलाने समुद्रमार्गे व्यापार चालत असे. अशाप्रकारे निसर्गाचे वारे पाठीशी असेल, तर माणसाचे कष्ट हलके होतात. पर्यायाने अगदी अथांग सागरही पार करणे त्यास शक्य होते.

वारे ओळखून कष्ट वेचावे

यशस्वी माणसे पुष्कळ कष्ट उपसतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना हे कष्ट कधी कष्ट वाटत नाहीत, कारण निसर्गवाऱ्याच्या प्रवाहावर अलगत स्वार होण्याचा अल्हाददायक अनुभव ते घेत असतात. थोडक्यात केवळ कष्टाची परिसीमा केल्याने यश मिळत नाही, तर त्या कष्टामागे निसर्गवाऱ्याची दिशा असावी लागते. जे निसर्गाचे वारे ओळखून कष्ट वेचतात, तेच आयुष्यात यशाला गवसणी घालतात.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!