आकलनातून सवय अंगीकारावी, अनुकरणातून रुजवावी!

‘माणूस हा सवयीचा गुलाम असतो’ असे म्हणण्यापेक्षा ‘सवय हा निसर्गनियमाचाच एक भाग आहे’ असे म्हणण्यास हरकत नसावी. कारण आयुष्य हे सवयीनेच जगले जाते, सवयीला पर्याय नाही. फक्त या सवयी कोणत्या असाव्यात? या प्रश्नावर आयुष्याचे उत्तर अवलंबून आहे. सवय ही हितकारक किंवा अहितकारक असू शकते. तेंव्हा हितकारक सवयी जोपासल्या जाव्यात आणि अहितकारक सवयी गळून पडाव्यात यादृष्टीने आपला विचार असायला हवा.

लहान मुलांमध्ये सवयी कशा रुजवाव्यात?

लहान मुलांना धाक दाखवून त्यांच्यामध्ये काही चांगल्या सवयी रुजाव्यात यासाठी शिक्षक आणि पालकांकडून प्रयत्न केला जातो. ही पद्धत उपयोगी असली, तरी कार्यक्षम आहे असे म्हणता येणार नाही. लहान मुले हे मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी निर्माण करायच्या झाल्यास वडीलधाऱ्यांनी त्याप्रथम स्वतः अंगीकारायला हव्यात. लहान मुलांना खेळीमेळीने, परंतु गांभीर्याने आपल्यासोबत घेतल्यास अनेक चांगल्या सवयींची शिदोरी त्यांना आयुष्यभरासाठी लाभू शकते.

मोठ्यांनी सवयी कशा अंगीकाराव्यात?

लहानपणी एखादी चांगली सवय जडणे सोपे असते असे समजले जाते. यात केवळ अंशतः तथ्य आहे असे मला वाटते. कारण लहानपणी जडलेली सवय ही आकलनातून नव्हे, तर अनुकरणातून आलेली असते. वय वाढेल तसे आपले आकलन देखील वाढू लागते. आकलनातून जेंव्हा एखादी कृती करण्यात येते, तेंव्हा त्यामागे सखोलशी समज असते. समजून-उमजून केलेली कृती सहजसाध्य होते आणि ती दीर्घकाळ टिकते. आकलनातून अंगिकारलेली सवय हितकारक ठरण्याची शक्यता अधिक असते, कारण आपण ती सर्वांगाने विचार करून, अनुभवाच्या पातळीवर पारखूनच स्वीकारलेली असते. अनुकरणातून आलेली सवय अशाप्रकारे हितकारक असेलच असे नाही, आपल्या सानिध्यातील परिस्थितीवर ते अवलंबून असते. म्हणूनच मोठ्यांनी एखादी सवय आपल्या वैचारिक प्रगल्भतेतून, आकलनातून अंगीकारल्यास त्याचा त्यांच्या आयुष्यावर, तसेच आसपासच्या माणसांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मला वाटते.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!