काही गोष्टी वेळेवर सोपवाव्यात!

आपण एखाद्याला आपुलकीने काही सांगायला गेलात म्हणून तो आस्थेने घेईलच असे नाही. अशावेळी कितीही तळमळ वाटली, तरी संयमाने राहणे आणि तेवढ्यापुरते सोडून देणे एव्हढेच आपल्या हातात असते. काही गोष्टी या कधी वेळेवर सोपवून पाहाव्या लागतात. कालप्रवाहात माणसांतील मतभेदाचा गुंता अनायसे अलगत सुटत जातो, नि जर हा गुंता उलगडला नाही, तर आपण अट्टाहासाने करावे असे त्यात काही नसते. अधूनमधून शांतपणे सांगणे आणि संयमाने सोडून देणे एव्हढीच एखाद्याला सांगण्याची रीत आहे. यातूनच झाले तर समोरच्याचे भले व्हावे अशी प्रांजळ अपेक्षा आपण मनोमन बाळगू शकतो.

संवाद
शांतपणे सांगावे, संयमाने सोडून द्यावे

अकलनापलिकडील योग्य गोष्टही अयोग्य वाटू शकते

पण केवळ निर्मळ मनाने सांगितले म्हणून आपण योग्य ठरतो असे नाही. प्रसंगी आपल्या आकलनशक्तीपलिकडील एखादी योग्य गोष्टदेखील आपणाला अयोग्य वाटू शकते. कधी आपल्याच समजुतीत चूक झालेली असू शकते. त्यामुळे केवळ समोरच्याला नव्हे, तर स्वतःला देखील वेळ देणे गरजेचे आहे. आपले विचार काळाच्या कसोटीवर उतरत आहेत का? याचे सातत्याने परीक्षण घडले पाहिजे. यादृष्टीनेही काही गोष्टी या वेळोवेळी वेळेवर सोपवून पहायला हव्यात. अशाप्रकारे इतरांना सल्ला देत असताना थोडीशी त्रयस्थथा, काहीसा संयम बाळगल्यास तणावरहित वातावरणात वैचारिक देवाण-घेवाण होणे शक्य आहे.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!