विस्मृतीत जाते, तेच नव्याने लक्षात येते

अनेक गोष्टी फार पूर्वीच चिंतनातून आपल्या लक्षात आलेल्या असतात. पण काही कारणाने आपल्यात कोणताही बदल न घडता आपण तिथल्या तिथेच रेंगाळत पुढे जातो. कालोघात लक्षात आलेले विस्मृतीत जाऊन पुन्हा नव्याने तेच ते लक्षात येत राहते. अशीच वर्षानुवर्षे निघून जातात, आपल्याला वाटते आपण आयुष्यात खूप दूर आलो आहोत, पण मागे वळून पाहिल्यास लक्षात येते की, प्रत्यक्षात आपण जागच्या जागीच घुटमळत आहोत. असे का होत असावे?

सारे जुळून येते, तेंव्हा जादू घडते!

जादू
जेंव्हा सारे जुळून येते, जादू घडते

‘जेंव्हा सारे जुळून येते, तेंव्हा जादू घडते’; पण जोपर्यंत सारे जुळून येत नाही, तोपर्यंत घडेल असे वाटूनही काही घडत नाही. यातच आपल्या वरील प्रश्नाचे उत्तर आहे असे मला वाटते. योग्य वेळ येत नाही, तोपर्यंत आपल्याला कळूनही वळत नाही, बदल घडेल असे वाटूनही आपल्यात बदल घडत नाही. योग्य वेळ ही तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत एकतर परिस्थिती आपल्या दृष्टीने अनुकूल होत नाही, किंवा आपले व्यक्तिमत्व पूर्णतः परिस्थितीनुरूप घडत नाही. जादू घडण्याकरिता जे जुळून येणे आवश्यक आहे ते हेच!

परिस्थिती आपल्यासाठी जुळून येणे हा एक दैवयोग असला, तरी परिस्थितीनुरूप स्वतःला जुळवून घेण्यादृष्टीने आपला स्वतःपरीने सातत्यपूर्ण प्रयत्न असायला हवा. जे आपल्या लक्षात आले आहे, ते कृतीत उतरावे यासाठी जागृत असायला हवे. अशाने आपले रेंगाळणे कमी होऊन आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जाता येईल!

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!