ज्ञानोपासनेतून दृष्टी बाळगावी!

आयुष्यात काय हवे आहे? याचे भान आणि त्यासाठी काय करायला हवे? याची जाण असायला हवी. आपण मात्र काहीतरी करून चांगले घडण्याची अपेक्षा करत राहतो. पण मुळात योग्य गोष्टी केल्याशिवाय योग्य गोष्टी घडत नाहीत. मग आपण सरळ योग्य गोष्टीच का करत नाही? कारण आपला हेतू चांगला असला, तरी आपल्याकडे दृष्टी नसते. दृष्टी कशी प्राप्त करावी? दृष्टी प्राप्त करण्याकरिता ज्ञानोपासना जोपासावी. शुद्ध हेतू लक्षात घेतल्यास नि ज्ञानोपासनेशिवाय तरणोपाय नसल्याचे जाणल्यास ज्ञानोपासना जोपासणे कठीण नाही.

अखेर आयुष्याची क्षितिजे अफाट आहेत. कितीही ज्ञानोपासना केली, तरी सारे आकाश काही आपल्या कवेत मावणार नाही. तेंव्हा जिथे आपण कमी पडत आहोत, तिथे तज्ञांच्या आधाराने चालावे, त्यांच्यावर आपली जबाबदारी सोपवून विनम्र राहावे. जिथे आपणाला दृष्टी नाही, तिथे द्रष्ट्याच्या दृष्टीने चालावे. अर्थात द्रष्टा देखील पारखूनच जाणावा. त्यासाठी पुन्हा जुजबी का असेना, पण ज्ञानोपासना आलीच! थोडक्यात, चौकसतेने सतत शिकत राहायला हवे.

बरे वाटेल या भाबड्या आशेने अशीच कोणतीतरी आयुर्वेदिक औषधे घेणे किंवा फायदा होईल या वेड्या आशेने असाच कोणतातरी समभाग विकत घेणे हे म्हणजे काहीतरी करून चांगले घडण्याची अपेक्षा बाळगण्यासारखे आहे. प्रत्येक विषयाचे आपले एक शास्त्र असते, जे निसर्ग नियमांच्या चौकटाला अनुसरून कालस्वरूप घडत जाते. या चौकटीची रूपरेखा आपण जाणायला हवी, तरच आयुष्यात आपणाला अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतील.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!