स्वयंचलनातून एकमेवाद्वितीय व्हावे!

आपल्याशिवाय होऊ शकते असे प्रत्येक काम आपण इतरांकडून करून घ्यायला हवे. आपला वेळ हा केवळ अशा कामास द्यावा जे आपणच करू शकतो. अर्थात व्यवहारात जरी हे पूर्णपणे शक्य नसले, तरी एकमेवाद्वितीय होण्यादृष्टीने आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असायला हवा. अशाने सर्वसाधारण कामातून आपली सुटका होत जाईल आणि आपले आयुष्य अनन्यसाधारण कार्यास कारणी लागत राहील.

काम करून घेणे ही वस्तूनिष्ठता

इतरांकडून काम करून घेणे हा वरकरणी आळस किंवा अन्याय वाटू शकतो, पण असे वाटणे हा प्रत्यक्षात वस्तुस्थितीचा विपर्यास म्हणावा लागेल. कारण कोणताही उच्चपदस्थ अधिकारी वा उद्योजक अशाप्रकारे इतरांनी रचलेल्या मनोऱ्यावरच उभा असतो, जो वस्तुनिष्ठतेचा एक भाग आहे. आज जो शिखरावर असतो, तोच कधी पाया म्हणून उभा असतो. यात कमीपणाचे वा मोठेपणाचे असे काही नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यातील एका टप्प्यातून जात असतो इतकेच!

स्वयंचलन
आयुष्यात स्वयंचलन आणावे

यंत्राद्वारे स्वयंचलन अवलंबावे

आजच्या तंत्रयुगात माणूस आपली सर्वसाधारण कामे यंत्रावर सोपू लागला आहे. अशाप्रकारे मनोऱ्याचा सर्वांत खालील थर हा आता यंत्रांनी रचला जात आहे. म्हणूनच आजच्या जगात स्वयंचलनाकडे आपला विशेष कटाक्ष असायला हवा. आपला वेळ मर्यादित आणि महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन असे कोणतेही काम आपण करू नये जे स्वयंचलित यंत्राकडून करून घेणे शक्य आहे. मोबाईल वा विजेचे बिल जर दरमहा आपल्या खात्यातून आपोआप वळते करता येत असेल, तर ते भरण्यात आपला वेळ दवडू नये. आपले घरगुती, तसेच कार्यालयीन कामकाज हे स्वयंचलनाच्या माध्यमातून शक्य तेव्हढे हलके करावे.

माणसाचे आयुष्य आणि आयुष्यातील वेळ ही सीमित आहे. त्यामुळे कमी वेळात जर अधिक काही साध्य करायचे असेल, तर त्याकरिता यंत्र व इतरांचा वेळ सत्कारणी लावणे क्रमप्राप्त आहे. अशाप्रकारे एकंदर आयुष्यात स्वयंचलन आणत गेल्यास आपले व्यक्तिमत्त्व अपोआपच एकमेवाद्वितीय होऊ लागेल.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!