ज्ञानाचे रूपांतर दृष्टीत, तसे दृष्टीचे रूपांतर जनुकांमध्ये होते

‘काहीतरी चुकते आहे’ हे माणसाला जाणवत असते, परंतु नेमके काय चुकते आहे? हे त्यास लवकर लक्षात येत नाही. एकतर ते कोणीतरी लक्षात आणून द्यावे लागते अथवा सखोल चिंतनातून ते हळूहळू लक्षात येत जाते. दोन्ही बाबतीत आकलन होण्याच्या प्रक्रियेत मेंदूला सातत्याने ताण द्यावा लागतो. हा ताण केवळ सुरुवातीच्या टप्प्यात असतो. एकदा ज्ञानाचे रूपांतर दृष्टीत झाले की तो आपसूक निवळतो.

नैसर्गिक उत्क्रांतीचे गमक

अर्थात एखादी गोष्ट लक्षात आली म्हणून सारेच समजले असेही होत नाही. सरतेशेवटी माणसाच्या बुद्धीची आणि त्याच्या आयुष्याची एक मर्यादा आहे. ही मर्यादा संपेपर्यंतच त्याच्या आकलनात वाढ होते. असे असले तरी जाता जाता माणूस त्याला प्राप्त झालेली दृष्टी नव्या पिढीस देतो. त्यामुळे फारशी वेळूर्जा न दवडता नव्या पिढीस ती दृष्टी सहजगत्या प्राप्त होते. पर्यायाने नवनव्या क्षेत्रात आकलनाचे मानवी क्षितीज सातत्याने विस्तारत जाते. हेच खरेतर नैसर्गिक उत्क्रांतीचे गमक आहे. कारण ज्ञानाचे रूपांतर जसे दृष्टीत, तसे दृष्टीचे रूपांतर सरतेशेवटी जनुकांमध्ये होते असे मला वाटते.

दृष्टी
दृष्टीचे रूपांतर जनुकांत होते

लबाड लांडगा ते प्रेमळ कुत्रा

कोणे एके काळी माणसासोबत राहण्यात आपला फायदा आहे याचे लांडग्याला ज्ञान झाले. जेंव्हा त्याचे ज्ञान अनुभूतीच्या पातळीवर वारंवार सिद्ध होऊ लागले, तेंव्हा त्याचे रूपांतर त्याच्या दृष्टीमध्ये झाले. ही दृष्टी जसजशी सिद्ध होत गेली, तसतसे कालोघात लांडग्यामध्ये जनुकीय बदल घडून त्याचे रूपांतर कुत्र्यामध्ये झाले असे दिसते. कारण कुत्र्याचे माणसाप्रती असलेले प्रेम हे त्यास कोणी शिकवावे लागत नाही, तर ते अगदी त्याच्या जनुकांमध्ये उतरलेले असते. अर्थात जर केवळ दृष्टी बदलली, तर अगदी लबाड लांडग्याचे रूपांतर देखील प्रेमळ कुत्र्यामध्ये होऊ शकते. हे केवळ एक उदाहरण झाले. परंतु याच परिपेक्षात आपणाला मानवाच्या उत्क्रांतीकडे देखील पाहता येईल.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!