जे धोकादायक, ते व्यापक!

धोका वाढल्यास त्यायोगे परताव्याची शक्यता वाढते, तर धोका कमी झाल्यास त्याअर्थी परताव्याची शक्यताही कमी होते. अशाप्रकारे ‘धोका’ आणि ‘परतावा’ यांच्यातील ‘समप्रमाण’ हा जसा निसर्गनियमाचाच एक भाग आहे. आयुष्याच्या बहुविध अंगांचा विचार करता त्यात आपल्याला हे समप्रमाण सर्वत्र आढळून येते. तसे या विश्वात कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही, तर त्यामागे निश्चितच काही कार्यकारणभाव असतो. म्हणूनच धोका आणि परतावा यांच्या समप्रमाणामागील कारण जाणून घेणे आणि त्यांचा मेळ घालण्याकरीता त्यांचा सखोलतेने मतितार्थ लावणे क्रमप्राप्त आहे.

दृष्टी नाही तिथे धडपड!

ज्यातले आपल्याला काही समजत नाही अशी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी धोकादायक असते असे म्हटले जाते, जे अगदी खरे आहे. अर्थात जिथे दृष्टी नाही, तिथे धडपड होणे सहाजिक आहे. ही धडपड थांबायची असेल, तर त्यासाठी प्रथम आपली दृष्टी विस्तारणे अगत्याचे आहे. त्यानंतर या व्यापकदृष्टीतून आपसूकच डोळस पावले पडू लागतात, जी आपल्याला सहजगत्या मार्गी लावतात. थोडक्यात वरकरणी इतरांना जे धोकादायक वाटते, ते आपल्यासाठी डोळस होते, आणि या डोळसपणातून जो सहजप्रवास घडतो, तो धोकादायक न राहता आयुष्यात सर्वोत्तम परतावा देतो! असे असले तरी मूळात धोका आणि परतावा यांच्यात समप्रमाण का आहे? याचाही विचार व्हायला हवा असे मला वाटते.

धोकादायक ते व्यापक!

धोकादायक, व्यापक
जे धोकादायक वाटते, ते व्यापकस्तरावर काम करत असते

जे आपल्या सामान्य जागृतावस्थेच्यापलीकडे असते, ते आपल्याला धोकादायक वाटते. परंतु त्याचवेळी ते आपल्या मर्यादेहून अधिक व्यापक असल्याने त्याची व्याप्तीही कल्पनातीत असते. अर्थात जे आपल्याला धोकादायक वाटते, ते व्यापकस्तरावर काम करत असते, आणि म्हणूनच त्यातून मिळणारा परतावा देखील व्यापक असतो. धोका आणि परतावा यांच्यामध्ये निसर्गात आपल्याला जे समप्रमाण दिसून येते, त्यामागील मूळ रहस्य ते हेच आहे!

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!