स्वतःला विचार करताना पहावे!

आपण स्वतःला पाहतो, स्वतःबद्दल विचार करतो, पण स्वतःला विचार करताना पहात नाही. परिणामी आपले स्वतःच्या सापेक्षतेतून विश्व पाहणे होते, परंतु विश्वाच्या सापेक्षतेतून स्वतःला पाहणे होत नाही. अशाने या विश्वातील अस्तित्वातून आपण स्वतःच्याच एका मनोविश्वात जगत राहतो, जिथे प्रत्यक्ष परिस्थितीचा विपर्यास घडलेला असतो. याकरिता आपण जर आपल्या दृष्टिकोनात थोडा बदल करू शकलो, तर अस्तित्वाच्या आकलनाची एक वेगळी व्यापक मिती आपणाला गवसू शकते, जी कल्पिलेल्या सामान्य बंधनांतून आपल्याला मुक्त करेल.

स्वतःला पहावे
स्वतःला विचार करताना पाहिल्यास नवी मिती गवसते

चित्ताचा दृष्टी’कोन’ बदलावा!

शहरातून वाट काढत असताना अनेकदा गल्लीबोळातून आपला रस्ता शोधावा लागतो, ज्यात हरवून जाण्याची शक्यता असते. कारण जमिनीवरील मर्यादित दृष्टीतून शहराकडे पाहिल्याने शहराचा एक अत्यंत सीमित भाग नजरेस पडतो, ज्यातून मुकामाचा कसलाच अंदाज लागत नाही. अशावेळी जर नकाशा पाहिला, तर आपणाला एक व्यापक दृष्टी प्राप्त होते, जी योग्य दिशेने घेऊन जाते. थोडक्यात चित्ताचा अर्थाअर्थी दृष्टि’कोन’ जर बदलता आला, तर सारे विश्वच एका वेगळ्या दृष्टीतून दिसू लागते, आणि ही दृष्टीच आपणाला भवसागर पार करून देते.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!